नाशिक : राज्यासह नाशिक शहराचे तपमान नवनवीन उच्चांक गाठत आहे. शहरात होणारी वृक्ष तोड पर्यावरणाच्या असमतोलला आणि तापमान वाढीस कारणीभूत असल्याचा प्रथमिक अंदाज बांधला जातोय. मात्र अशी स्थिती पुन्हा उद्भवू नेय म्हणून गेल्या दोन वर्षापासून काही नाशिककर सातत्याने प्रयत्न करत असून त्यांनी देवराई बहरवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐन कडाक्याच्या उन्हात जिथे मोठं मोठी जंगलं कोरडी ठाक पडलीत. तिथे नाशिकच्या सातपूर परिसरातील हा डोंगर सूर्यनारायणाच्या प्रकोपातही हिरवाईने नटलेला पाहायला मिळतोय. वनविभागाच्या ताब्यात असणारा हा डोंगर फाशीचा डोंगर म्हणून ओळखला जायचा. अनेक अनुचित घटनांचा साक्षीदार असण्या-या या डोंगराकडे कुणी फारसं फिरकतही नव्हतं. 5 जून 2015 च्या जागतिक पर्यावरण दिनी नाशिकच्या डोंगरावर तब्बल दहा हजार झाडं लावण्यात आली. या उपक्रमामुळे दोन वर्षातच डोंगर हिरवागार झालाय. 


एकीकडे शहरातील झाडं दिवसेंदिवस नष्ट होताहेत. त्यात नाशिक महानगरपालिकेने वृक्षतोडीसाठी ऐन उन्हाळ्याचा मुहूर्त शोधल्याचा विरोधाभासही बघायला मिळतोय. त्यातच पर्यावरणप्रेमींनी या डोंगरावर केलेली हिरवीगार किमया सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतंय.


उपक्रमाच्या सुरूवातीला हजारोंच्या संख्येने नाशिककर डोंगरावर एकवटले होते. प्रत्येकानं एक एक झाड दत्तक घेतलं होतं. त्यानंतर बहुतेकांनी या डोंगराकडे पाठ फिरवली. आता हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या पर्यावरणप्रेमी हे आव्हान पेलताहेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी मदत करण्याची गरज आहे.