परभणी : निवडणुकांचा प्रचार थंडावतो न थंडावतो तोच परभणी जिल्ह्यात पैसे वाटून मत विकत घेणारे सक्रिय झाले आहेत. पाथरी तालुक्यातील हदगाव गटाअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना पैसे वाटत असतांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात विस्तार अधिका-याच्या फिर्यादीवरून आचारसहिंता भंग केल्याचा गुन्हा पाथरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हदगाव बुद्रुक गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष भावना अनिल नखाते ह्या या गटातून निवडणुकीच्या मैदानात आहेत. या गटाअंतर्गत असलेल्या वरखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन कार्यकर्ते हातात मतदारांची यादी घेऊन फिरत होते. प्रती मतदान पाचशे रुपये या प्रमाणे जबरदस्तीने मत विकत घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आढळून आले. 


शिवसेनेच्या कार्यर्त्यांनी या दोघांना चांगला चोप देत त्यांना पाथरी पोलिसांच्या हवाली केले. या घटनेनंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. पाथरी पोलीस ठाण्यात दोन कार्यकर्त्यांवर आदर्श आचार संहिता भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.