गडचिरोली : नक्षलवाद्यांना पैसे पुरवणाऱ्या तीन तेंदूपत्ता कंत्राटदारांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 75 लाखांच्या रकमेसह पत्रकंही जप्त करण्यात आली आहेत. आलापल्ली इथे पोलिसांनी ही कारवाई केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तिन्ही आरोपींना २८ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. अशा प्रकारची गडचिरोली जिल्ह्यातली ही पहिलीच कारवाई ठरल्याने, अहेरी पोलिसांचं कौतुक होत आहे.


गडचिरोली जिल्ह्यातल्या प्राणहिता इथले पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे आणि त्यांचं पथक नक्षलविरोधी अभियान राबवून परत येत होते.  त्याचवेळी मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमाराला त्यांना आलापल्ली इथे नंबरप्लेट नसलेली बोलेरो गाडी आढळली.


पोलिसांनी या गाडीत बसलेल्यांची चौकशी केली असता ते गोंधळून गेले. त्यानंतर गाडीच्या तपासणीत हा मुद्देमाल आढळला. या प्रकरणी नागराज समय्या पुट्टा, पहाडिया तुळशिराम तांपला आणि रवी मलय्या तनकम अशी अटक केलेल्या कंत्राटदार आरोपींची नावं असून, ते तेलंगणा राज्यातील आहेत.