पुणे : पुण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी चक्क मांजराला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना पुणे न्यायालयाने नोटीस बजावली असून न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. चव्हाण यांचे मांजरप्रेमी शेजारी विजय नावडीकर यांनी याप्रकरणी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वंदना चव्हाण या पुण्यातील सदाशिव पेठेत यशोधन अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या विजय नावडीकर यांनी सात- आठ मांजरी पाळलीत. ती मांजरं सोसायटीतील कोणाच्याही घरात घुसतात.वंदना चव्हाण यांनी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विश्रमाबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु बंदोबस्त झाला नाही. 


एक दिवस एक मांजर त्यांच्या घरात शिरलं असता, त्या मांजराला सळईने मारहाण करण्यात आली. त्यामुळे नावडीकर यांनी वंदना चव्हाण यांच्या विरोधात पुणे जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल केली होती. मात्र चव्हाण कोर्टात हजर राहत नसल्याने कोर्टाने त्यांना हजर राहण्यास सांगितलं आहे. जोपर्यंत मांजराला न्याय मिलणार नाही तो पर्यंत लढा चालू ठवणार असल्याचं नावडीकरानी म्हटलंय.


याच अपार्टमेंटमध्ये राहणा-या इतर रहिवाशांनी हे आरोप फेटाळले आहेत. खासदार वंदना चव्हाण सध्या दिल्लीत असल्याने त्या या विषयावर बोलण्यास उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. या खटल्याचा निकाल काय लागायचा तो लागेलच. पण यानिमित्ताने शहरात मांजर आख्यान सुरु झालंय.