पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचे काटे उलटे फिरत असल्याचं दिसून येतं आहे. पुण्यात काही वर्षांपूर्वी भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी गुटखा किंग रसिकलाल धारिवाल यांनी दिलेली २० लाखांची देणगी आयोजकांनी नाकारली होती. त्याच रसिकलाल धारिवाल यांचा राष्टवादी काँग्रेस शनिवारी सत्कार करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुटखा किंग रसिकलाल धारिवाल यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सन्मान करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं येत्या शनिवारी गुरुपौर्णिमा निमित्तानं, वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणा-या मान्यवरांचा सत्कार सोहळा पुण्यात आयोजित केला आहे. 


गुरुजन गौरव नावाने होणा-या या कार्यक्रमात अभिनेते नाना पाटेकर, कायदेतज्ज्ञ ऍडव्होकेट भास्करराव आव्हाड, अस्थितज्ज्ञ डॉक्टर शरद हर्डिकर या मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. या मान्यवरांसोबतच गुटखा किंग रसिकलाल धारिवाल यांचाही सत्कार आयोजित केला जाणार आहे. 


रसिकलाल धारिवाल हे आधी माणिकचंद आणि आता आरएमडी नावाने प्रसिद्ध असलेल्या गुटख्याचे सर्वेसर्वा आहेत. गुटख्याच्या व्यसनानं अनेकांचं आयुष्य कर्करोगामुळे संपलं आहे. तरीही राष्ट्रवादीचं हे अनोखं माणिकचंद प्रेम सर्वांच्या भुवया उंचावणारं ठरलं आहे.