पुणे : पिंपरी - चिंचवड आणि पुणे महापालिकांसोबतच पुणे जिल्हा परिषदेची निवडणूकही लक्षवेधी ठरणार आहे. पुणे जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत आहे. अनेक पंचायत समित्याही राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. पुणे हा पवारांचा जिल्हा असल्याने या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागले आहे.


कोणी इच्छुक नाही, भाजपची मदार बापट यांच्यावर!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र वेगळं चित्र असणार आहे. पुणे आणि  पिंपरी चिंचवड च्या तुलनेत जिल्ह्यात भाजपची वाईट अवस्था आहे. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य केवळ तीन आहेत. जिल्ह्यात भाजपमध्ये यायला फारसं कोणी इच्छूक नाही. भाजपचे जिल्ह्यात दोन आमदार आहेत. तर, दौंडचे आमदार राहुल कुल भाजपच्या मित्र पक्षाचे आमदार आहेत. त्या व्यतिरिक्त भाजपची मदार पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर असेल. 


भापजपेक्षा शिवसेनेची ताकद जास्त 


भाजपच्या तुलनेत शिवसेनेची जिल्ह्यात जास्त ताकत दिसते. शिवसेनेचे दोन खासदार, एक राज्यमंत्री आणि एक आमदार आहेत. तर, तेरा विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांसह शिवसेना जिल्हा परिषदेतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे.  पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रमाणे जिल्ह्यातही काँग्रेसची अवस्था दारुण आहे. जिल्ह्यात काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत, संग्राम थोपटे. त्यांच्यावर आणि काही प्रमाणात हर्षवर्धन पाटील यांच्यावर काँग्रेसची मदार असेल.   


भाजपला बरेच परिश्रम करावे लागणार!


जिल्हयात राष्ट्रवादीकडे स्वतः अजित पवार, दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे असे दिग्गज आहेत. सोबत जिल्हा बँक, दूध संघ, साखर कारखाने अशी मोठी यंत्रणा दिमतीला आहे. जिल्हा परीषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्ट बहुमत आहे. १३ पैकी आठ पंचायत समित्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. शिवसेना आणि भाजपकडे प्रत्येकी एक तर काँग्रेसकडे ३ पंचायत समित्यांची सत्ता आहे. त्यामुळे शहरात जरी भाजपची ताकद वाढलेली असली तरी जिल्ह्यात मात्र भाजपला बरेच परिश्रम करावे लागणार आहेत.