सातारा : 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा  चलनातून बाद झाल्यानंतर निर्माण झालेली सुट्या पैशांची चणचण कमी करण्यासाठी आणि  बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत होण्याच्यादृष्टीने 20, 100, 500 व 2 हजार रुपयांच्या नव्या कोर्‍या नोटांची बंडलेच्या बंडले सोमवारी सातार्‍यात कंटेनर भरून आली. कडेकोट पोलिस बंदोबस्तात या नोटा सकाळी सकाळीच प्रतापगंज पेठेतील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत दाखल झाल्या असून सर्व बँकांना त्याचे वाटप केले जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 8 नोव्हेंबर रोजी 500 व 1 हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द ठरवल्या. त्यानंतर बँकांना आपल्या शाखा आणि एटीएममध्ये पुरेशी रोकड भरण्यासाठी बंद ठेवल्या गेल्या. 


मात्र, त्यानंतरही रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांपर्यंत तत्परतेने पैसे पोहोचवलेले नाहीत. त्यामुळे आर्थिक व्यवहारावर मर्यादा आल्या आहेत. बाजारपेठेतील व्यवहार मंदावले असून बँका व एटीएमसमोरील रांगा हटता हटत नाहीत. नागरिकांना दैनंदिन व्यवहार करणेही अवघड होऊन बसले आहे. 


प्रतापगंज  पेठेतील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सोमवारी सकाळी  सकाळीच  कंटेनरमधून  कोट्यवधी  रुपयांच्या नव्या कोर्‍या नोटा सातार्‍यात आणण्यात आल्या. रिझर्व बँक मुंबई येथून प्रचंड पोलिस बंदोबस्तात या नोटा सातारा येथे आणल्या गेल्या. मोठ-मोठ्या लाकडी बॅाक्समध्ये या नोटा ठेवण्यात आल्या होत्या.   कंटेनरच्या  चारही बाजूला प्रचंड  पोलिस फौजफाटा तैनात होता.


 स्टेट बँकेच्या बंदुकधारी सुरक्षा रक्षकांचाही खडा पहारा होता.  अशा कडेकोट बंदोबस्तात या नोटा उतरवण्यात येत होत्या. या नोटांमध्ये 20,100, 500 व 2 हजार रुपयांच्या नोटांचा समावेश होता. मात्र नोटांच्या रकमेचा एकूण आकडा किती आहे? याबाबत बँकेमार्फत कमालीची गोपनियता पाळण्यात आली होती. स्टेट बँकेतून अन्य बँकांनाही रोकड देण्यात येत होती. नोटांचे पेटारे टेम्पो आणि अन्य वाहनातून शहराबाहेरील बँकांसाठी रवाना होत होती. त्यामुळे दिवसभर स्टेट बँकेला पोलिस  छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.