महाड : सापडलेले दोन मृतदेह वेगळ्याच दुर्घटनेतले
महाड दुर्घटनेला १९ तास उलटल्यानंतरही बचावकार्याला अद्याप यश आलेलं नाही. सापडलेले दोन मृतदेह वेगळ्याच दुर्घटनेतले असल्याचं आता समोर येतंय. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती चुकीची असल्यानं नातलगांमध्ये संतापाचं वातारवण आहे.
रायगड : महाड दुर्घटनेला १९ तास उलटल्यानंतरही बचावकार्याला अद्याप यश आलेलं नाही. सापडलेले दोन मृतदेह वेगळ्याच दुर्घटनेतले असल्याचं आता समोर येतंय. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती चुकीची असल्यानं नातलगांमध्ये संतापाचं वातारवण आहे.
महाडमधल्या सावित्री नदीत तब्बल १९ तासांनंतरही बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू आहे. वाहून गेलेल्या दोन्ही एसटी बसेस शोधण्यासाठी एनडीआरएफच्या तीन पथकांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नदीला आलेला पूर आणि सततच्या पावसामुळं बचावकार्यात अडथळे येत आहेत. तसंच आता अंधार पडत चालल्यामुळं बचत कार्य आणखीनच आव्हानात्मक होणार आहे. दोन्ही बसेसमध्ये तब्बल 22 प्रवासी असल्याची माहिती आहे. तसंच काही तवेरासारखी छोटी वाहनंही या पुलावरून जात असताना नदीत वाहून गेल्याची शक्यता आहे. त्यामुळं बेपत्ता प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
नौदलाची दोन आणि तटरक्षक दलाची दोन अशा चार हेलिकॉप्टरच्या मदतीनं हे बचावकार्य सुरू आहे. जवळपास 160 जवान 12 बोटींच्या मदतीनं हे कार्य सुरू आहे. नौदलाचे पाणबुडेही या बचावकार्यात सहभागी झालेत. वाहून गेलेल्या एसटी बसेसचा आंबेतच्या खाडीपर्यंत शोध घेतला जातोय. जयगड- मुंबई, राजापूर-बोरीवली या दोन एसटींचा पोलादपूरहून निघाल्यानंतर त्यांचा संपर्क झालेला नाही. मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ राजेवाडी इथं सावित्री नदीवर ब्रिटीशकालीन हा पूल होता.