विकास भदाणे, जळगाव : टायपिंगमधल्या साध्या चुकीमुळं जळगावच्या एका खासगी माध्यमिक शाळेतल्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आलीय... पगारच नसल्यानं आजारांनी ग्रस्त होऊन त्यातल्या तब्बल चार शिक्षकांचं निधन झालंय. गेंड्याच्या कातडीचं सरकार कसं वागतं, पाहूयात हृदय हेलावून टाकणार हा रिपोर्ट....


'टा' चा 'सा' केला...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेशव्यांच्या काळात आनंदीबाईंनी 'ध' चा 'मा' केला होता. राज्य सरकारच्या शिक्षण खात्यातही अशा आनंदीबाई आहेत. या सरकारी आनंदीबाईंनी 'टा' चा 'सा' केल्यानं एका माध्यमिक शाळेतल्या शिक्षकांना त्याचे चटके सोसावे लागतायत. 


१९९१ साली जळगाव जिल्ह्यातल्या टाकरखेडा गावात सुरु झालेलं महात्मा फुले शिक्षण विकास मंडळ, अंमळनेर संचालित माध्यमिक विद्यालय... गेल्या २६ वर्षांपासून तिथल्या शिक्षकांना पगारच मिळालेला नाही. कारण गावाचं नाव आहे 'टाकरखेडा'... पण मंत्रालयातल्या सरकारी बाबूंनी कागदपत्रांवर 'साखरखेडा' असा उल्लेख केल्यानं शाळेची मान्यता तांत्रिक गोंधळात रखडली.


२० वर्षांचा संघर्ष


याबाबत वारंवार विनवण्या करूनही गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारला जाग आली नाही. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर सरकारनं २०१० मध्ये शाळेला मान्यता दिली खरी... पण विनाअनुदानित तत्त्वावर... त्यामुळं २० वर्षं संघर्ष करूनही शिक्षकांच्या हाती धुपाटणंच आलं.


पगार नसल्यानं आजारांनी ग्रस्त होऊन १९९५ मध्ये राजेंद्र पाटील, २०१० मध्ये रतिलाल पाटील, जानेवारी २०१६ मध्ये लिपिक हेमंत बिऱ्हाडे आणि याच महिन्यात शाळेचे मुख्याध्यापक गुलाब पाटील यांचं निधन झालं. आता आपल्या पोराबाळांचं काय होणार? या काळजीनं बाकीच्या शिक्षकांना रडू कोसळतंय. 


गावातली ही जुनी शाळा अजूनही विनाअनुदानित तत्वावर चालतेय. तर शासकीय नियम धाब्यावर बसवून सुरू झालेल्या दुस-या शाळेला मात्र सरकारी मान्यता मिळालीय.


शिक्षक करतायत रोजंदारीवर कामं...


साध्या तांत्रिक चुकीमुळं या शाळेतले शिक्षक गेल्या २६ वर्षांपासून रोजंदारीवर काम करून ज्ञानदानाचं कार्य करतायत. त्यांच्या या हालअपेष्टांची दखल घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे आतातरी त्यांना न्याय देतील का?