धुळे : राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.. जुलै महिन्याच्या अखेरीस जवळपास सर्व जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली आहे. मात्र धुळे आणि नंदूरबार जिल्ह्याकडे पावसाने चक्क पाठ फिरवल्याचं चित्र आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या जिल्ह्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. धुळे जिल्ह्यात ऊणे 25 तर नंदूरबार जिल्ह्यात ऊणे 19 पावसाची नोंद आहे. 


धुळे आणि नंदूरबार पाठोपाठ भंडारा जिल्ह्यातील शेतक-यांना पावसाची प्रतिक्षा असून इथं सरासरी इतका पाऊस झाला नाही.


गुजरात आणि मध्य महाराष्ट्राच्या सीमेवर धुळे, नंदूरबार हे दोन जिल्हे असून बंगालच्या उपसारगरातून पर्जन्ययुक्त हवामान परिस्थिती निर्माण न झाल्यामुळे  या दोन जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झाल्याचं  हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे.


गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यात सरासरीच्या 88 % पाऊस पडला होता. गेल्या वर्षी दोन पावसातला खंडही मोठा होता. 


यंदा हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार धुळे जिल्ह्यात सरासरीच्या 80 %  पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. जुलै अखेरी तो 60 %  होणे अपेक्षीत होतं  मात्र आजपर्यंत तो केवळ 50 % इतका पडला आहे. 


पावसाला धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा विसर पडल्यामुळे या दोन जिल्ह्यातील शेतीची परिस्थिती बिकट बनली  आहे.


सततच्या ढगाळ वातावरणामुळे कडधान्य पिकांवर प्रचंड रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.एकीकडं पाऊसाने ओढ दिली आहे तर दुसरीकडं पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे इथला शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे..