प्रशांत परदेशी, नंदुरबार : मिरची उत्पादनासाठी राज्यात आणि देशात नावलौकिक असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात यंदाही मिरची लागवड करण्यात आली आहे. यात अनेक ठिकाणी मिरचीचा पहिला तोडा करण्यात येऊन मिरची बाजारात विक्रीसाठी शेतकरी घेऊन गेले होते. मात्र बाजारात गेलेल्या शेतकऱ्यांना दर घसरणीचा 'ठसका' अनुभवण्यास मिळतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षी नंदुरबार जिल्ह्यात सुमारे चार हजार 100 हेक्टर परिसरात मिरची लागवड करण्यात आली होती. यंदा या क्षेत्रात काही अंशी वाढ होऊन हा आकडा साधारण 5 हजार 400 हेक्टरपर्यंत स्थिरावला आहे. पावसाचा लपंडाव, ढगाळ वातावरण, किड्यांचा प्रादुर्भाव यावर मात करत शेतकऱ्यांनी मिरची रोपे जगवली आहेत. यात अनेक शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यापासून पहिला तोडा करून तो माल बाजारात पाठवला होता. या ठिकाणी साधारण दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत दर मिळण्याची अपेक्षा असतानाच दरांमध्ये घसरण झाली. तीन ते चार रुपये किलो दराने मिरचीची खरेदी बाजारात करण्यात आली.


नंदुरबार बाजारापर्यंत लागणारे वाहन भाडे, मजुरांचा खर्च, फवारणी, पाणी, वीजवापर, लागवड आणि महागड्या रोपांची खरेदी असे एकएक दिव्य पार पाडून तयार झालेल्या फळाला केवळ तीन आणि चार रुपये भाव पाहून अनेक जण निराश झाले होते. मात्र पर्याय नसल्याने अखेर, मिरची मिळेल त्या भावात विक्री करून शेतकरी माघारी फिरले. 


उत्पादन खर्चही निघणार नसल्याने बळीराजाचे आर्थिक गणित चुकणार आहे एखाद्या अभिनेत्याने सोशल साईटवर केलेल्या तक्रारीची दखल घेणारे राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्याचा मालाचा हमी भावाचा संदर्भात अशी तत्परता दाखवावतील का? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करताहेत.