औरंगाबाद : तुम्ही STच्या खिडकीतून रुमाल किंवा बॅग टाकून कधी विंडो सिट पकडलीये का? नसेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण तुम्हाला अशा सिट पकडणाऱ्यांमुळे त्रास तर नक्कीच झाला असणार. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र यापुढे तुम्हाला हा त्रास होणार नाही. कारण आता स्थानकामध्ये गाडी शिरताना बसच्या काचा बंद असणार आहेत. 
 
एस.टी. स्टँडवर कोण धावपळ उडते... रुमाल, बॅगा खिडकीतून टाकण्यासाठी जो-तो रेटारेटी करतो. काही जण तर दरवाजा उघडण्याची वाट न पाहता स्वतःच खिडकीमधून घुसतात.


ही गावाकडच्या एस.टी. स्टँडमधली सीट रिझर्व्हेशनची खास स्टाईल. या प्रकारांमुळे लहान मुलं, स्त्रिया आणि वृद्ध प्रवाशांनी अनेकदा सीटच मिळत नाही. अनेकदा बसमधल्या भांडणांना हे खिडकी-बुकिंगच कारणीभूत असतं.  पण आता हे चित्र लवकरच बदलणार आहे. 


एसटी महामंडळानं एक परिपत्रक काढलंय. त्यानुसार बस स्थानकात शिरण्यापूर्वी कंडक्टर सगळ्या खिडक्या बंद करून घेणार आहेत. 


सततच्या भांडणांना कंटाळलेले वाहक-चालक आणि नियंत्रकांनीही याचं स्वागत केलंय. 


खिडकीतून रुमाल टाकणं बंद झाल्यामुळे प्रथम येणाऱ्या प्रवाशांना आधी जागा मिळेल. त्यामुळे प्रवाशांमध्येही या निर्णयामुळे आनंदाचं वातावरण आहे. 


एसटीच्या या नव्या प्रयोगामुळे बस स्टँडवरचा गोंधळ काही प्रमाणात का होईना कमी होईल. थोडी शिस्तही लागेल. मात्र अतिउत्साही प्रवाशांना थांबवण्यासाठी एसटीला बरेच प्रयत्नही करावे लागणार आहेत.