पुणेकरांसाठी गुड न्यूज! यंदा पाणीकपात टळणार
गेली अनेक वर्षे उन्हाळा सुरु होताच पुणेकरांच्या पाचवीला पुजलेली पाणीकपात यावर्षी टळणार आहे.
पुणे : गेली अनेक वर्षे उन्हाळा सुरु होताच पुणेकरांच्या पाचवीला पुजलेली पाणीकपात यावर्षी टळणार आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यावर्षी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्यानं पुणेकरांना मोठा दिलासा मिळालाय.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या ४ धरणात मिळून १०.५५ टीएमसी म्हणजे ३६.१८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी पाणीकपात होणार नाही. मात्र उपलब्ध पाणीसाठा जपून वापरणं गरजेचं आहे.
धरणातील उपयुक्त पाणीसाठा १५ जुलै पर्यंत पुरवण्याचं जलसंपदा विभागाचं नियोजन आहे आणि जूनमध्ये अपेक्षित पाऊस झाला नाही तर मात्र पाण्याचं नियोजन बदलावं लागणार आहे. त्यामुळे आज परिस्थिती समाधानकारक असली तरी उद्याबाबतची अनिश्चितता कायम आहे.