पुणे : जलसंपदा विभागानं पुणे महापालिकेचा पाणी पुरवठा थांबवलाय. कोणतीही सूचना न देता जलसंपदा विभागानं पाणी पुरवठा बंद केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात १२०० एमएलडीपेक्षा जास्त पाणी वापरत असल्याचा ठपका ठेवत जलसंपदा खात्यानं ही कारवाई केलीय. मात्र, हा आरोप खोटा असून राजकीय सुडापोटी पालकमंत्री गिरीष बापट यांनी ही कारवाई केल्याचा आरोप महापौर प्रशांत जगताप यांनी केलाय.


तसंच पाणी पुरवठा पूर्ववत केला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा महापौरांनी दिलाय. या निर्णयामागे आर्थिक गणितं असल्याचा आरोप देखील महापौरांनी केला आहे. 


पुण्यात २४ तास पाणी पुरवठ्याची योजना प्रस्तावित आहे. त्यासाठी वॉटर मीटर बसवले जाणार आहेत. ही योजना २८०० कोटी रुपयांची आहे. त्यातील २२५० कोटी रुपये कर्ज रोख्यांमधून उभारण्याचा प्रस्ताव होता. मात्र, मंगळवारी दुपारी कर्ज रोख्यातून २२५० कोटी रुपये उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने फेटाळला. हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर काही तासातच जलसंपदा विभागाने पाणी पुरवठा बंद केला.


त्यामुळं वॉटर मीटर योजना आणि पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय यामध्ये संबंध असल्याचा आरोप महापौर प्रशांत जगताप यांनी केला आहे.