मुंबई : महाराष्ट्रातील एक अभिमानास्पद व्यक्तिमत्व असलेल्या कल्पना सरोज यांचा कहाणी खरं तर महाराष्ट्रातील अनेकांना माहित नाही. व्यवसाय क्षेत्रात सरोज यांचं नाव आज मानाने घेतलं जातं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विदर्भातील एका दलित परिवारात जन्मलेल्या कल्पना सरोज यांना खरं तर शिक्षणाची खूप आवड होती. पण, शाळेत असलेल्या भेदभावाला मात्र त्या कंटाळल्या. अशातही हिंमत न हारता त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. पण, शेवटी नशीब आडवं आलं. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांच्या वडिलांनी त्यांचं लग्न लावून दिलं.


लग्नानंतरी आयुष्यात तणाव वाढतच राहिला. सासरच्यांनी सरोजचा छळ करण्यास सुरुवात केली. याची माहिती त्यांच्या वडिलांना समजताच वडिलांनी त्यांना माहेरी परत आणले. पण, शेजाऱ्यांनी आणि समाजाने मारलेल्या टोमण्यांना वैतागून सरोज यांनी विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पण, सुदैवाने त्या वाचल्या.


या नवजीवनानंतर त्यांनी स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला. वयाच्या १६ व्या वर्षी मुंबईला येऊन त्यांनी शिवणकामाचा व्यवसाय सुरू केला. दिवसाला १६ ते १८ तास काम करुन त्यांनी फर्निचरचा एक व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाने त्यांना व्यवसाय क्षेत्रातील बारीक गोष्टींचीही माहिती करुन दिली.


२००१ साली त्यांना कमानी ट्यूब्स या नुकसानीत असलेल्या कंपनीची माहिती मिळाली. या कंपनीला वाचवण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आणि कंपनीची सूत्र आपल्या हाती घेतली. कंपनीवर असलेल्या कर्जाची त्यांनी पुनर्रचना करुन घेतली. या कंपनीला त्यांनी केवळ वाचवलेच नाही, तर कंपनीला फायद्यातही आणले. कंपनीवरील सर्व कर्जही फेडले.


आता कल्पना सरोज या त्याच कंपनीच्या मालकीण आहेत आणि या कंपनीची किंमत ११२ दशलक्ष इतकी आहे. व्यापार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना २०१३ साली पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. भारतीय महिला बँकेचं बोर्ड ऑफ डायरेक्टर हे मानाचं पदही त्यांना दिलं गेलं.