नागपूर : कांदा अजूनही रडवतोच आहे. आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या बाजारपेठेत म्हणजे कळमन्यात कांद्याचे दर एक रूपया किलोवर आलेत. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर ही मध्य भारतातली मोठी बाजारपेठ. इथल्या कळमना मंडीत गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांनी आणलेला कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. दोन दिवस उलटूनही शेतकऱ्यांनी आणलेली कांद्याची गाडी तशीच उभी आहे. तब्बल सहाशे किलोमीटर अंतरावरील नाशिक जिल्ह्याच्या मालेगावातून हे शेतकरी कांदा विकण्यासाठी इथे आले. मात्र इथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. नाशिकहून आणलेल्या कांद्याला नागपूरच्या बाजारात केवळ अडीचशे रूपये भाव मिळत आहे.


नागपूर बाजारात उत्तम प्रतीच्या कांद्याला किलोला 5 ते 7 रूपये भाव मिळत आहे. कांद्याचं उत्पादन जास्त झाले आहे. नोटबंदीमुळे शेतक-यांनी आपला कांदा रोखून धरला होता. त्यामुळे बाजार खुले झाल्यावर अचानक आवक कमालीची वाढली. तसंच राज्यातून अनेक ठिकाणाहून बाजारात कांदा आल्यामुळे कांद्याला भाव नसल्याचं व्यापारी म्हणतात. 


नागपूर कांदा बाजारात पूर्वी 8 ते 10 गाड्या येत होत्या. आता 30 गाड्या आल्याने कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे मिळेत त्या भावात कांदा विकावा लागत आहे.