नाशिक : रब्बी कांद्यापाठोपाठ खरीपाच्या लाल कांद्यानेही शेतकऱ्यांना साथ दिलेली नाही. त्यामुळे आशिया खंडातली कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, लाल कांदा अवघा एक रुपये किलो दराने विकला गेलाय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कमालीचे हतबल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार वर्षांनंतर लाल कांद्याला शंभर रुपयांच्या आसपासचा निचांकी भाव मिळत आहे. यावर्षी चांगल्या वातावरणामुळे लाल कांद्याचं उत्पादन चांगलं झालं. 


महाराष्ट्राप्रमाणेच गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानातही लाल कांद्याचं उत्पन्न चांगलं आल्यानं, राज्यातल्या लाल कांद्याला देशांतर्गत मागणी कमी आली. तर निर्यातीच्या बाबतीत सततच्या बदलत्या धोरणामुळे परदेशातली बाजारपेठही गमावली गेल्यानं, निर्यात थंडावलेलीच आहे.


आखाती देशांनी भारतातील कांदा सोडून दुसऱ्या देशातल्या कांद्याला प्राधान्य दिलंय. त्यातच 31 डिसेंबरला कांदा निर्यातीच्या अनुदानाची मुदत संपत असल्यानं, येत्या काळात अजूनही दर घसरण्याची भीती व्यक्त केली जातेय. 


एकरी पन्नास ते साठ हजार रुपये खर्चूनही लाल कांदा शेतकऱ्यांच्या पदरात काहीच देत नसून, उलट कर्जबाजारी ठरतोय. ज्या मालाचा उत्पादन खर्च नऊशे रुपयांच्या वर आहे. त्याला अवघा शंभर ते सहाशे रुपयांच्या आसपास विकावं लागतंय. म्हणून कांद्याला पंधराशे ते दोन हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.