मुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे. चंद्रपुरातून या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली असली तरी या यात्रेवरून आता नवीन वाद ओढावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसी बसमधून विरोधक संघर्ष यात्रेमध्ये आल्यामुळे भाजपनं विरोधकांवर टीका केली आहे. शेतकऱ्यांसाठी ही एसी यात्रा का सहल म्हणायची असा सवाल विनोद तावडेंनी उपस्थित केला आहे. तर संघर्ष यात्रा म्हणजे विरोधकांची नौटंकी आहे. राहुल गांधींनीही अशीच नौटंकी केली होती अशी टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. 


फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहाणं, मर्सिडिजमधून फिरण आणि डोळ्यावर गॉगल राहून फिरणं म्हणजे संघर्ष यात्रा नाही तर पिकनिक असल्याचा टोलाही राम कदम यांनी लगावला आहे. शेतक-यांना कर्जमाफी, शेतीमालाला योग्य दर, वाढलेली महागाई या प्रश्नांवर हि संघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसह शेकाप, रिपब्लिकन पक्ष कवाडे गट, समाजवादी पक्ष, एमआयएम आणि युनायटेड जनता दल या संघर्ष यात्रेत सहभागी झालेत. चंद्रपूर जिल्ह्यातून सुरू होणारी ही यात्रा यवतमाळ, नागपूर, वर्धा, अमरावती, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, पुणे मार्गे 3 एप्रिलला मुंबईत पोहचणार आहे.