पैशांच्या आदलाबदली प्रकरणी पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणींवर गुन्हा
भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे संचालक असलेल्या वैद्यनाथ सहकारी बँकेतील पैशांच्या आदलाबदली प्रकरणी पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
बीड : भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे संचालक असलेल्या वैद्यनाथ सहकारी बँकेतील पैशांच्या आदलाबदली प्रकरणी पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
डॉ. सुरेश अडवाणींसह बँकेचे 2 व्यवस्थापक आणि 2 कर्मचा-यांचाही यात समावेश आहे. एकूण २५ कोटींच्या रक्कमेचा हा घोटाळा असून जुन्या नोटांच्या स्वरुपातील ही रक्कम वैद्यनाथ सहकारी नागरी बँकेच्या घाटकोपर येथील शाखेतून तसेच बीड येथील मुख्यालयातून १९ नोव्हेंबर रोजी बाहेर काढण्यात आली होती.
त्यापैकी १५ कोटी रुपये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरली गेली. आणि उर्वरित १० कोटींची रक्कम पुन्हा बीडला घेऊन जात असताना १५ डिसेंबरला मुंबई पोलीसांनी चेंबूर येथे कारवाई दरम्यान पकडली होती. या प्रकरणी तपास सुरू होता.
शुक्रवारी या घोटाळ्याशी संबंधीत लोकांच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि बीड येथील कार्यालये आणि घरांवर छापे घालून झडती घेण्यात आली. त्यानंतर सीबीआयने केलेल्या चौकशीवरुन वैद्यनाथ बँकेचे घाटकोपर शाखांचे व्यवस्थापक, बँकेचे दोन कर्मचारी, मुंबईतील डॉक्टर तसेच औरंगाबादच्या CIIGMA रुग्णालयातील डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.