प्रकल्पग्रस्त गावात ८ महिन्यांपासून पाणी नसल्याने पायपीट!
जिल्ह्यातल्या तारापूर अणुप्रकल्पालगत घिवली गाव. या प्रकल्पग्रस्त गावात ८ महिन्यांपासून पिण्याचं पाणी बंद आहे. त्यामुळे गावातल्या महिलांना ३ ते ४ किलोमीटरपर्यंत दिवस रात्र पाण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे.
पालघर : जिल्ह्यातल्या तारापूर अणुप्रकल्पालगत घिवली गाव. या प्रकल्पग्रस्त गावात ८ महिन्यांपासून पिण्याचं पाणी बंद आहे. त्यामुळे गावातल्या महिलांना ३ ते ४ किलोमीटरपर्यंत दिवस रात्र पाण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे.
तारापूर अणुशक्ती प्रकल्पाकरता घिवली गावातल्या पिण्याच्या पाण्याच्या ११ विहिरी गेल्यानं, १९६५पासून आजपर्यंत, घिवली गावासमोर पाण्याचं संकट उभं राहिलं आहे. त्यानंतर १९८८ मध्ये पाणी योजना आणली गेली. पहिल्यांदा घिवली गावासाठी हे पाणी मोफत देण्यात येईल असं सांगण्यात आलं. नंतर पाणी पुरवठ्याचं प्रमाण कमी झालं. आणि आता गावक-यांनी पाण्याचं बिल भरलं नसल्याचं कारण देत, त्यांचं पाणीच बंद करण्यात आलंय.
समुद्र किनारी वसलेल्या घिवली गावात ११ विहिरी असल्यानं इथे पिण्याच्या पाण्याची कधीच टंचाई भासली नाही. मात्र आता अणुशक्ती प्रकल्पाचे आणखी दोन प्रकल्प वाढल्यानं, तसंच संरक्षक भिंत बांधल्यानं या गावात आता फक्त ३ विहिरी शिल्लक राहिल्या आहेत. त्याचबरोबर अणुऊर्जा प्रकल्पाच्या रेडीयेशनमुळे गावातल्या विहिरींतलं पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल, प्रयोगशाळेनं दिलाय. मात्र तहान भागवण्याकरता, गावकऱ्यांना हेच पाणी प्यावे लागतंय.