नाशिक : पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या छगन भुजबळांची मंत्री असलेल्या पंकजा मुंडेंनी घेतलेल्या भेटलाही वेगळा अर्थ होता. या भेटीनंतर नाशिक जिल्ह्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.  कट्टर विरोधक दिलीप खैरे यांनी आज  भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते यांची भेट घेतली. दरम्यान, ओबीसी मोर्चा काढण्याच्या हालचाली सुरु झाल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळांची प्रकृतीत सध्या ठिक नाही. त्यामुळे त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बुधवारी सकाळी राज्याच्या महिला ब बालविकास मंत्री पंकजा मुंडे अचानक भुजबळांच्या भेटीला रुग्णालयात येऊन थडकल्या. मुख्यमंत्री परदेशात असताना पंकजा मुंडेंनी भुजबळांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, मराठा मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी ओबीसी मोर्चा असल्याची चर्चाही आहे.


अडचणीत असताना आपल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांची मदत घेऊन पक्षावर दबाव टाकण्याचे राजकारण राज्याच्या इतिहासात यापूर्वी अनेकदा खेळले गेले आहे. अगदी पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडेंनीही हे राजकारण केले होते. गोपीनाथ मुंडे यांची भाजपामध्ये घुसमट होत असताना त्यांनी छगन भुजबळ आणि शेकापचे नेते जयंत पाटील या ओबीसी नेत्यांची मदत घेऊन भाजपावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. सध्या पंकजा मुंडेंचीही पक्षात आणि सरकारमध्ये घुसमट होत आहे. 


अगदी मुख्यमंत्र्यांबरोबर ट्विटवरवरून वाद होण्यापर्यंत पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध  बिघडले गेले आहेत. या पार्श्वभूमवीर छगन भुजबळ यांची भेट घेऊन ओबीसींचे राजकारण करून पक्षावर दबाव टाकण्याचा पंकजा मुंडेचा प्रयत्न असू शकतो. दुसरीकडे मराठा समाजाचे जिल्ह्या जिल्ह्यात लाखा लाखाचे मोर्चे निघत आहेत. यामुळे भाजपा आणि मुख्यमंत्रीही हादरले आहेत. या पार्श्वभूमवीर भुजबळ यांची भेट घेऊन ओसीबींच्या एकत्रिकरणाचा प्रयत्न करायचा आणि ओसीबींच्या एकत्रिकरणा आडून पक्षावर दबाव टाकायचा प्रयत्नही या भेटीमागे असू शकतो, अशी चर्चा सुरु आहे.