भगवान गडाच्या निमित्तानं पंकजा - प्रीतम मुंडेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन
भगवान गडावर जाण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर येऊन आपले वडील गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं.
बीड : पंकजा मुंडे समर्थकांसह भगवान गडावर दाखल झाल्यात. यावेळी आपल्यासोबत बहिण प्रीतम मुंडे, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, राजू शेट्टी, राम शिंदे आणि काही आमदार आपल्यासोबत असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.
अजून नामदेव शास्त्रींची भेट नाही...
भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन पंकजा मुंडेंनी घेतलंय... उल्लेखनीय म्हणजे, या ठिकाणी नामदेव शास्त्रीही उपस्थित होते. मात्र, पंकजांनी त्यांची भेट घेणं आत्ता तरी टाळलंय.
कार्यकर्ते आक्रमक
आक्रमक कार्यकर्त्यांनी मात्र गडावरच भाषण करण्याचं पंकजांना आवाहन केलंय. पंकजा जात असलेल्या गाडीला कार्यकर्त्यांनी घेरलंय. सभोवतालची गर्दी पाहून पंकजांनी माईक हातात घेऊन शांततेचं आवाहन शांततेचं आवाहन करायला सुरुवात केलीय.
दरम्यान, पंकजांची गडावर एन्ट्री होताच सामान्यांना दर्शनासाठी गडावर प्रवेशबंदी करण्यात आलीय. महत्त्वाचं म्हणजे, भगवान गडावर सामान्यांना दर्शनासाठी बंदी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भगवान गडावर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.
वडिलांच्या समाधीचं दर्शन
भगवान गडावर जाण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर येऊन आपले वडील गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी, सगळे वाद संपले आहेत. भगवान गड पित्रुतुल्य आहे... मी कुठलाही वाद कधी निर्माण केला नाही... थोडं मन भरून आलं आहे... मात्र, आता भगवान गडावर जाणार अणि स्वच्छ मानाने दर्शन घेणार असं, पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.
दरम्यान, भगवान गडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली असली तरी गडाखाली मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आलीय.
बहिणीच्या समर्थनासाठी प्रीतम मुंडेही मैदानात...
प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथ गडाचे दर्शन घेऊन भगवान गडापर्यंत समर्थकांसह रॅली काढली. परळी बीड व परिसरातील जवळपास २०० गाड्यांचा ताफा रॅलीत सहभागी झाला.
दसऱ्याच्या निमित्ताने प्रीतम मुंडे यांनी काढलेली ही रॅली म्हणजे एक प्रकारे पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ मोठे शक्ती प्रदर्शन असल्याचं म्हटलं जातंय.
सकाळी सुरु झालेली ही रॅली थोड्याच वेळात भगवानगडावर पोहचेल. त्यानंतर पंकजा गोपीनाथ गडावर दर्शन घेऊन भगवान गडासाठी रवाना होतील.