मृत्यूनंतरही `ती` आईवडिलांना नकोशीच
मुलगी म्हणून ती जन्माला आली. जन्मताच तिला जन्मदात्यांनी नाकारलं. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पण मृत्यूनंतरही तिच्या नशिबी प्रतारणाच आली. तिचा मृतदेह घेण्यासही तीच्या जन्मदात्यांनी नकार दिला.
पिंपरी-चिंचवड : मुलगी म्हणून ती जन्माला आली. जन्मताच तिला जन्मदात्यांनी नाकारलं. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पण मृत्यूनंतरही तिच्या नशिबी प्रतारणाच आली. तिचा मृतदेह घेण्यासही तीच्या जन्मदात्यांनी नकार दिला.
मानवतेला काळीमा फासणारी आणि कोणत्याही सहृदयी माणसाला संताप आणणारी घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडलीय़. मुलींचा जन्म ही खरं तर साजरा करण्यासारखी गोष्ट... पण पिंपरी चिंचवडच्या एका दाम्पत्याने मानवतेला काळिमा फासला.
काही दिवसांपूर्वी या महिलेनं यशवंतराव स्मृती रूग्णालयात एका मुलीला जन्म दिला. मात्र मुलीचा जन्म झाल्यामुऴे नाराज झालेल्या दाम्पत्याने मुलीकडे लक्षच दिलं नाही. या मुलीला श्वास घ्यायचा त्रास होत होता. त्यामुळे तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला... नकोशी असलेली मुलगी हे जग सोडून गेली तरी नराधम दाम्पत्य शांत झालं नाही... त्यांनी तिचा मृतदेहही स्वीकारला नाही... सध्या या बाळाचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये आहे. आणखी दोन दिवस वाट पाहू असं हॉस्पिटल प्रशासनाने म्हटलंय.
सांगलीत उघड झालेल्या स्त्रीभ्रूण हत्येच्या प्रकरणाने अवघा महाराष्ट्र हादरलाय. त्या प्रकरणात रोज नवनव्या गोष्टी बाहेर येत आहेत. मात्र इथला पिंपरी चिंचवडचा प्रकार त्याहूनही भयानक म्हटला पाहीजे. बाळाला जन्मला घालून, मुलगी म्हणून नाकारलंच पण त्या बाळाच्या मृत्यूनंतर साधा त्य़ाचा मृतदेह न स्वीकारणा-या या नराधमांना समाज कोणती शिक्षा देणार?