नागपूर : महानगरपालिकेच्या बँक खाती गोठवण्यात आली आहेत. सुमारे साडे चार हजार सफाई कर्मचा-यांचा भविष्य निर्वाह निधी जमा न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2011 ते 2013 या दोन वर्षांच्या कालावधीत महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यानांचा पीएफ जमा करण्यात आलेला नाही. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी विभागानं पालिकेवर ही कारवाई केली. भविष्य निर्वाह निधी विभागाने महापालिकेच्या बँक ऑफ महाराष्ट्रची खाती गोठवली आहेत. 


बँक खाती गोठविल्याने महापालिकेला बँक खात्यातून कोणत्याही स्वरूपाचे आर्थिक व्यवहार करता येणार नाही. यामुळे महापालिका प्रशासनापुढे गंभीर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. एलबीटी कर रद्द केल्यावर महापालिकेला राज्य सरकारकडून अपेक्षित अनुदान प्राप्त न झाल्याने महापालिकेवर आर्थिक भार बसला. ज्यामुळे हा पीएफचा निधी जमा न करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 


महानगर पालिकेच्या ४५०० सफाई कर्मचाऱ्यांना २०११ पासून भविष्य निर्वाह निधी योजना लागू करण्यात आली आहे तेंव्हा पासून ही रक्कम विभागाकडे जमा करणे आवश्यक होते.मात्र २०११ ऐवजी २०१३ पासून महापालिका प्रशासनाने पीएफ जमा केला.त्यामुळे तीन वर्षाचा १५ कोटींचा पीएफ न भरल्याने भविष्य निर्वाह निधी विभागाने महापालिकेच्या बँक ऑफ महाराष्ट्रची खाती गोठवली आहेत.