पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री झाल्यानं पिंपरी-चिंचवडकर नाराज
मनोहर पर्रिकर यांनी संरक्षणमंत्रीपद सोडून गोव्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यामुळे पिंपरी चिंचवडकर नाराज झालेत.
पिंपरी-चिंचवड : मनोहर पर्रिकर यांनी संरक्षणमंत्रीपद सोडून गोव्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यामुळे पिंपरी चिंचवडकर नाराज झालेत. मनोहर पर्रिकर संरक्षणमंत्री असतानाच्या काळातच पिंपरी चिंचवडमध्ये बोपखेल गावाच्या रस्त्याचा मुद्दा गाजला होता.
पिंपरी चिंचवड महापालिकेने आणि बोपखेलवासियांनी या रस्त्याचा पाठपुरावा करत थेट संरक्षण मंत्रालय गाठलं होतं. त्यानंतर मनोहर पर्रिकरांनी या संदर्भात अनेक बैठकही घेतल्या. त्यामुळे हा रस्ता पुन्हा सुरू होण्याची भाबडी आशा बोपखेलवासी बाळगून होते.
मनपा निवडणुकीपूर्वी बोपखेल रक्षक चौक रस्त्याचा प्रश्न निकाली निघणार असा दावाही केला गेला. प्रश्न अंतिम टप्प्यात आहे असं सर्वांनाच वाटलं होतं, पण तेवढ्यात गोव्यात पर्रिकर परतले आणि बोपखेल रस्त्याचा प्रश्न जैसे थेच राहीला. हा रस्ता होण्याचा दावा पदाधिकारी करत असले तरी हा प्रश्न तुर्तास तरी खोळंबणार यात शंकाच नाही.