पुणे : पुण्यात मेट्रो प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय. रिमोट कंट्रोलचे बटन दाबून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे उद्घाटन केलं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेदेखील उपस्थित राहिले.


पवारांना टोला...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात याधीच मेट्रो झाली असती तर बरं झालं असतं... खर्च कमी झाला असता, पण आधीच्या सरकारने माझ्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी करायच्या ठेवल्या आहेत, असं म्हणत पंतप्रधानांनी स्टेजवर बसलेल्या शरद पवारांनाही एक टोला हाणला.


काळ्या पैसा धारकांनो सावधान...


५० दिवसांनंतर इमानदार लोकांचा त्रास कमी होणार आहे, बेईमानांचा त्रास वाढणार आहे या आपल्या मुंबईत दिलेल्या इशाऱ्याचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदींनी पुण्यातही केला. बॅकेत जाऊन काळ्याचा पांढरा करण्याचा विचार करणाऱ्यांनी सांभाळून राहा, कायद्यानुसार काय ते करा, अन्यथा तुमची सुटका नाही... कुणाचीही हयगय केली जाणार नाही, असंही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात म्हटलं.


नोटाबंदीनंतर...


८ नोव्हेंबर रोजी मी घेतलेल्या निर्णयाने सगळ्यांना एका रांगेत आणून उभं केलं... आजपासून ४० वर्षांपूर्वी ही कामे झाली असती, तर आज सामान्य माणसाला रांगेत उभं राहण्याची वेळ आली नसती. तुम्हाला रांगेत उभं राहताना पाहून मलाही वेदना होतात... असं म्हणत पंतप्रधानांनी सामान्यांसाठी सहानुभूतीही व्यक्त करतानाच 'माझी लढाई छोट्यांना ताकद देण्यासाठी आहे' असंही स्पष्ट केलं.    


देशात शहरीकरणाचा वेग मोठा आहे... शहरं बनत असलेल्या गावांच्या विकासासाठी आम्ही अर्बन मिशन हाती घेतलंय. त्यामध्ये गावांचं गावपण टिकवून ठेवतानाच त्यांना शहरांप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असंही पंतप्रधानांनी म्हटलंय.  


पंतप्रधानांचं डिजिटल स्वागत

मोबाईलचे फ्लॅश ऑन...


मुख्यमंत्र्यांच्या आवाहनावरून पंतप्रधानांचं अनोख्या पद्धतीने स्वागत पुणेकरांनी केलं. आपापल्या मोबाईलची फ्लॅश लाईट ऑन करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर उपस्थितांनी त्यांच्या हातातील मोबाईलच्या लाईट्स एकाच वेळी लावल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघालेला दिसला.