पुणे : पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाला आज पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी मिळालीय. त्यामुळे उद्या (बुधवारी) हा विषय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरीसाठी येणार आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर मेट्रो प्रकल्प खर्या अर्थानं रुळावर येणार आहे. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी ही  माहिती दिलीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकिय इच्छाशक्तीचा अभाव, एलिव्हेटेड कि अंडरग्राऊंड याबाबतचा वाद, स्वयंसेवी संस्थांचे आक्षेप अशा अनेक कारणांनी पुण्याची मेट्रो गेली ७ वर्षे रखडली आहे. 


यापूर्वी प्रकल्प आराखड्यातील त्रुटींवर बोट ठेवत पीआयबीने प्रस्ताव परत पाठवला होता. त्यावरून चांगलेच राजकीय आरोप प्रत्यारोप रंगले होते. या पार्श्वभूमिवर मेट्रोचा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत पुन्हा एकदा केंद्राकडे पाठवण्यात आला होता. 


त्याठिकाणी विविध अडथळे पार करत मेट्रो प्रकल्प मान्यतेच्या अंतिम टप्पयावर पोचलाय. त्यावरील महत्वपूर्व निर्णय बुधवारी अपेक्षित आहे. प्रकल्पाच्या मान्यतेचा हा अंतीम टप्पा पार करताच येत्या महापालिका निवडणूकीपूर्वी म्हणजे आचारसंहिता लागण्यापूर्वी मेट्रोचं भूमिपूजन शक्य आहे. किंबहुना भाजप सरकारचा तोच मनसुबा असल्याची चर्चा आहे. 


प्रकल्पाविषयी-


मार्ग क्रमांक १- पिंपरी ते स्वारगेट : १६.५८ किमी
मार्ग क्रमांक २- वनाज ते रामवाडी : १४.६५ किमी
प्रकल्पाचा अपेक्षित खर्च - १२ हजार ९९८ कोटी 
पुर्णत्वाचा अपेक्षित कालावधी- ५ वर्षे
  
येत्या 24 डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोचं भूमीपूजन होणार असल्याची चर्चा आहे.