पुणे : चार मित्रांच्या सतर्कतेने बनावट नोटांचं रॅकेट चालवणाऱ्या टोळीचं बिंग फुटलं. ५० लाखांच्या बनावट नोटांसह एका आरोपीला अटक करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहा लाखांच्या बदल्यात ३० लाख रूपये देतो, असं आमीष दाखवत नोटांचं रॅकेट चालवणाऱ्या एका आरोपीला पकडण्यात देहू रोड पोलिसांना यश आलंय. या आरोपींनी वाई तालुक्यातील धोममधल्या संतोष पोळ, मिथून कांबळे आणि नरेश कांबळे यांनाही असंच आमीष दाखवलं होतं. 


त्यानुसार आरोपींनी या मित्रांना बनावट नोटाही दिल्या. त्या नोटा बाजारात वठल्यावर पुढच्या व्यवहारासाठी देहू रोडमधल्या गुरूद्वाराजवळ भेटण्याचं ठरलं होतं. पण या मित्रांनी वरील घटनेची माहिती पोलिसांना कळवली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत एकाला अटक केली. उर्वरीत आरोपी मात्र पसार झाले.


षडयंत्राचा पोलिसाचाही समावेश


विशेष म्हणजे, या टोळीत देहू रोड इथल्या पोलीस ठाण्याच्या एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याचा दावा तक्रारदाराने केलाय. बनावट नोटा देताना हा पोलीस कर्मचारी ठरलेल्या ठिकाणी छापा टाकून दोन्ही आरोपींना ताब्यात घेत असे... नंतर अर्थपूर्ण व्यवहार करून दोघांची सुटका करत असे अशी माहिती तक्रारदार पोळ यांनी दिली.


पोलिसांनी मात्र हा बनावट नोटांचा प्रकार नसल्याचं म्हटलंय. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचा पोलिसांचा दावा आहे.


पोलिसांचा हा दावा असला तरी संपूर्ण प्रकरणाची माहिती द्यायला मात्र त्यांनी बरीच टाळाटाळ केलीय. तसंच प्रश्न विचारायलाही पोलिसांनी बंदी घातली होती. त्यामुळे या प्रकरणात बरंच पाणी मुरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.