अकोला : नाशिक आणि औरंगाबादनंतर आज अकोल्यातही पोलीस भरतीत एका उमेदवाराकडून फसवण्याचा प्रकार उघड झालाय. विशेष म्हणजे अकोल्यात करण घोडके नावाच्या तरुणानं उंची वाढवण्यासाठी चक्क बॉक्स पॅकिंगची लोखंडी क्लिपच केसांच्या आत लपवली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करणने आधी डोक्यावर पॅकिंग क्लीप चिकटवण्याच्या जागचे केस कापून घेतलेत. त्याजागी क्लीपवर व्यवस्थित केस चिकटवून ती क्लिप डोक्यावर पद्धतशीरपणे लावून घेतलीय. या सर्व हूशारीत त्याची उंची अर्धा इंचाने वाढणार होतीय. मात्र, भरती प्रक्रियेत उंची मोजतांना उपस्थित कर्मचार्यांना करणवर संशय आलाय. त्याला बाजूला घेत तपासणी केली असता त्याचं हे कृत्य उघड झाले. 


करणला लगेच ताब्यात घेवून त्याला सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. सिटी कोतवाली पोलिसांनी करणवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. त्याला पोलीस भरती प्रक्रियेतूनही बाद करण्यात आल्याचं पोलीस सुत्रांनी सांगितलेय. त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलीय. 


नाशिकमध्ये पोलीस भरतीवेळी उंची वाढवण्यासाठी केसांचा विग लावल्याची घटना घडली होती तर औरंगाबादमध्येही उंची वाढावी म्हणून एका उमेदवारानं तळपायाला चक्क पाच रुपयांचं नाणं लावलं होतं.