पुणे : राजकारणात घराणेशाही नवीन नाही. पण एकाचवेळी नवरा-बायको दोघंही निवडणुकीच्या रिंगणात असतील तर त्याचं वेगळंच कुतूहल असतं. पुण्यात अशा एक-दोन नाही, चक्क 4 जोड्या निवडणूक लढवत आहेत. गंमत म्हणजे हे सगळेच्या सगळे डबे आहेत ते मनसेच्या इंजिनाचे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बायको नगरसेविका झाली तरी अनेकदा खरा कारभारी असतो तो तिचा नवराच. पण म्हणतात ना, पुणं तिथं काय उणं. कारभारी आणि कारभारीण दोघंही निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याचं चित्र यंदा पुण्यात पाहायला मिळतंय. मनसेचे शहराध्यक्ष हेमंत संभूस हे प्रभाग क्र. 12 मधून, तर त्यांच्या पत्नी पद्मजा संभूस प्रभाग क्र. 13 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. संभूस पहिल्यांदाच निवडणूक लढवतायत. तर त्यांच्या सौभाग्यवती गेल्यावेळी थोडक्यात पराभूत झाल्या होत्या.


विद्यमान नगरसेवक राजेंद्र वागसकर आणि विद्यमान नगरसेविका वनिता वागसकर म्हणजे मनसेची जोडी नंबर वन. गेल्यावेळी महापालिका सभागृहात पोहोचलेलं हे एकमेव दाम्पत्य. यंदा आपल्या विजयाची पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याशिवाय मनसेचे विद्यमान नगरसेवक वसंत मोरे यंदा प्रभाग क्र. 40 मधून उभे आहेत. तर त्यांच्या पत्नी शकुंतला मोरे प्रभाग क्र. 38 मधून नशीब आजमावतायत. 


मनसेचे गटनेते किशोर शिंदे प्रभाग क्र. 30 मधून तिस-यांदा निवडणूक लढवतायत. तर त्यांच्या पत्नी माधवी शिंदे प्रभाग क्र. 12 मधून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. मनसेच्या या चार जोड्या म्हणजे डबल इंजिनाच्या गाड्याच आहेत. सध्या मनसेच्या इंजिनाला घरघर लागली आहे. आता या चौघांपैकी कुणाकुणाचं इंजिन महापालिकेपर्यंत धडकतं हे पाहावं लागेल.


पाहा व्हिडिओ