अश्विनी पवार, पुणे : ती तिची बाईक स्टार्ट करते आणि जगभराची भटकंती करायला निघते. नुकतीच ती बाईकवरुन एकटी नेपाळला जाऊन आली. पूजा दाभीचं हे आगळं वेगळं पॅशन. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातली अवघ्या 24 वर्षांची बाईक रायडर. जग पाहण्याचं, नवीन ठिकाणांना भेट देण्याचं तिचं पॅशन. सोबतीला असते तिची KTM बाईक. बाईक रेसिंगची आवड असणा-या पूजानं बायकिंगमध्येच करिअर करायचं ठरवलं. त्यासाठी तिनं रेसिंगच्या अनेक स्पर्धांमध्येही भाग घेतला. पण बाईक ट्रॅकवर तिचं मन रमलं नाही. ती तिच्या बाईकसोबत जग पाहायला बाहेर पडली. नुकताच तिनं भारत नेपाळ अशा दोन्ही देशांमध्ये 26 हजार किलोमीटरचा टप्पा एकटीने पार केला...रुग्णवाहिकेला रस्ता द्या, असा संदेश तिनं यानिमित्तानं दिला. 


भौगोलिक विविधतेने नटलेल्या भारत देशाचा प्रवास बाईकवरुन एकटीनं करणं तसं अवघड होतं.... कधी हायवे, कधी डोंगर-द-या, कधी घाट, कधी खाचखळगे.... पण पूजानं ते आव्हान स्वीकारलं. भारत-नेपाळ प्रवासाआधी पूजानं उत्तर भारत आणि दक्षिण भारताची सफर केलीये....गेल्या काहीच वर्षात पूजानं 75 हजाराचा किलोमीटरचा टप्पा पार केलाय.


नेपाळहून परताना सलग 36 तास प्रवास करण्याचं ध्येय पूजाने ठेवलं होतं आणि ते तीने पूर्णही केलं... पूजाला कुठलाही विक्रम करायचा नाही तर जगाचा कानाकोपरा तिच्या बाईकसोबत पाहण्याचं तिचं स्वप्न आहे.