पुणे : स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून पुणे भाजपमध्ये मंगळवारी जोरदार राडा झाला. गणेश बिडकर आणि गणेश घोष हे दोघेही भाजपचे स्थानिक नेते आपल्या कार्यकर्त्यांसह एकमेकांना भिडले.


 दोघांमध्ये तुफान हाणामारी झाली. यात महापालिकेतल्या सभागृह नेत्याच्या कार्यालयाची तोडफोड झाली. या राड्याचे एक्स्लुझिव्ह सीसीटीव्ही शॉट्स झी २४ तासच्या हाती लागले आहेत. 
 
 सभागृहनेत्याच्या कार्यालयाबाहेर केलेली तोडफोड या शॉट्समध्ये स्पष्ट दिसतेय. ३ वेगवेगळ्या कॅमेऱ्यांमध्ये हा राडा स्पष्टपणे चित्रीत झालाय. मारहाणीत टी शर्ट फाटलेले भाजप नेते गणेश बिडकरही दिसत आहेत. लाल टी शर्ट मधील हे गणेश बिडकर आहेत. हाणामारीत त्यांचा टी शर्ट फाटल्याचं स्पष्ट दिसतंय.  
 
 बिडकर यांनी मारहाणीची तक्रार दाखल का केली नाही असा प्रश्न निर्माण होतोय. मात्र, एवढ्या गडबडीतही त्यांनी आयुक्तांकडे जाऊन वेळेत उमेदवारी अर्ज भरला. थोडा उशीर झाला असता तर, त्यांचा अर्ज बाद झाला असता. बिडकर यांच्या आधी गडबडीत सभागृह नेते श्रीनाथ भीमाले जाताना दिसतायेत. त्यांनाही धक्का बुक्की झाल्याचं बोललं जात आहे. 
 
 स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न काही कार्यकर्ते करत आहेत. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला असता तर, हे दालन देखील फोडलं गेलं असतं. बाहेरच्या पॅसेजमध्ये गणेश घोष यांचे कार्यकर्ते कुंड्या फोडताना दिसत आहेत. गणेश घोष मोठ्यानं ओरडत आहेत, रडत आहेत. त्यांना कार्यकर्त्यांनी लिफ्टमध्ये घालून बाहेर नेलं. 
 
 दरम्यान, पुणे महापालिकेत भाजप कार्यकर्त्यांनी राडा घालून २४ तास झालेत. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप आणि प्रशासन टाळाटाळ करत आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या या राड्याच्या पार्शवभूमीवर मुख्यमंत्री आज पुण्यात आहेत. ते या गंभीर प्रकारची कशी दाखल घेतात याकडे लक्ष लागले आहे.