पुणे : युरोपमधील सर्वात उंच शिखर माऊंट एलब्रस सर करण्याचा पराक्रम पुण्यातील तेरा वर्षांच्या तनिश खोत यानं केला आहे. हे शिखर सर करणारा तो आशिया खंडातील सर्वात कमी वयाचा गिर्यारोहक ठरला आहे. माऊंट एलब्रस जगातील पाचव्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माऊंट एलब्रस 5 हजार 642 मीटर उंचीवर आहे. या उंचीवर तनिशनं तिरंगा फडकावला आहे. ताशी सव्वाशे किलोमीटर वेगानं वाहणारे वारे, हाडं गोठावणारी थंडी, मायनस 25 डिग्री तापमान, गुडघ्यापर्यंत पाय आत जातील एवढा बर्प, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तनिशनं हा पराक्रम केला आहे.  


गेल्या दीड वर्षांपासून तनिश याची तयारी करत होता. या तयारीचाच एक भाग म्हणून त्यानं मागील वर्षी लेह- लडाखमधील स्टोक कांग्री हे वीस हजार फूट उंचीचं शिखर सर केलं होतं.


तनिशचे वडिल सुधीर खोत यांनी त्याला आठव्या वर्षापासूनच गिर्यारोहणाचा छंद लावला. आतापर्यंत तनिशनं राज्यातील वीस दुर्गम किल्ले सर केलेत. हिमाचल प्रदेशमधील १३ हजार फुटांवरील मणी महेश लेक हा ट्रेक पूर्ण केलाय. 


माऊंट एलब्रसच्या चढाईतदेखील त्याचे वडिल त्याच्याबरोबर होते. त्यांनीही तनिशबरोबर हे शिखर सर केलंय. एव्हरेस्ट वीर चेतन केतकर हे तनिशचे मार्गदर्शक आहेत. त्यांचाही तनिशच्या यशात मोठा वाटा आहे.