पुणे :  एका बाजूला राजकारणी आणि बडे लोक या दुष्काळातही भव्य दिव्य लग्नसोहळा साजरा करत असताना दुसरीकडे पुण्याच्या अपूर्वा आणि कुशलनं मात्र आपलं लग्न जरा वेगळ्या पध्दतीने केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याजवळील डोणजे गावातील 'आपलं घर' हा आश्रम. अनाथ मुलांबरोबरच, वृध्दांसाठी सुरु करण्यात आलेल्या या आश्रमामध्ये नुकतेच सनईचे सुर घुमले. निमित्त होतं ते अपूर्वा आणि कुशल यांच्या लग्नाचं. या लग्नाला कोणताही थाटमाट नव्हता. ना कोणत्याही नेत्याचं स्वागत. या उलट आश्रमातील लहानग्यांची उपस्थिती आणि वृध्दांचे आर्शिवाद याचाच वधु-वरांवर वर्षाव झाला. 


गेल्या सात-आठ वर्षांपासून नियमितपणे या आश्रमाला भेट देणा-या अपूर्वाने येथील वृध्दांचा आणि लहानग्यांचा एकटेपणा अगदी जवळून पाहिला. त्यांना पैशाची मदत करण्यापेक्षा त्यांच्या जीवनात आनंद कसा फुलवता येईल या विचारातून आपलं लग्न "आपलं घर" मध्येच करण्याचा तिने निर्णय घेतला आणि तिच्या या निर्णयाला तिच्या पालकांनी आणि कुशलनंही साथ दिली.


'आपलं घर'मध्ये संपुर्ण दिवसभर एक वेगळचं चैतन्य पहायला मिळालं. आश्रमातील लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वांनीच घरातलच लग्न असल्याच्या भावनेनं या सोहळ्यात सहभाग घेतला. 


एखाद्या लग्नात खरं तर दोन कुटुंब एकत्र येत असतात मात्र अपूर्वाने घेतलेल्या या निर्णयामुळे अपूर्वाच्या आणि कुशलला आपलं घरच्या रुपानं अजून एक कुटुंब मिळालयं. आपलं लग्न अशा वेगळ्या पद्धतीनं करण्याचा निर्णय घेऊन अपूर्वाने समाजापुढे एक आदर्श घालून दिलाय.