महाडमध्ये पूरस्थिती कायम; व्यापाऱ्यांची धावपळ
जिल्हयाच्या काही भागात आज पाचव्या दिवशीही पावसाचा जोर कायम असून महाडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
रायगड : जिल्हयाच्या काही भागात आज पाचव्या दिवशीही पावसाचा जोर कायम असून महाडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे . महाड शहरातील बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने व्यापारयांची एकच धावपळ उडाली . व्यापारयांनी आपल्या दुकानातील सामान हलवण्यास सुरूवात केली आहे.
नगरपरिषदेने नागरीकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या पालिकेने पूरस्थितीचा सामना करण्याची तयारी केली आहे. रायगड जिल्हयात गेल्या २४ तासांत १९४३ मिलीमीटर पाऊस झाला. त्यात महाडमध्ये २३० तर पोलादपूरात २५६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यातच महाबळेश्वर येथे कोसळत असलेल्या पावसाने महाडच्या बाजूने वाहणाऱ्या काळ आणि सावित्री या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली.
काल रात्री भरतीच्यावेळी पाणी शहरात शिरायला सुरूवात झाली होती. मात्र ओहोटी लागल्याने पाणी पातळी कमी झाली . मात्र आज सकाळी पुन्हा पाणी शहरात घुसण्यास सुरूवात झाली.