मुंबई : यंदा मे महिन्यातच पावसानं महाराष्ट्रात हजेरी लावलीय. यामुळे, उन्हानं हैराण झालेल्यांना वातावरणानं थोडा थंडावा अनुभवायला मिळाला असला तरी शेतकऱ्यांची मात्र झोप उडालीय.


शिर्डीत पाऊस...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साईंच्या शिर्डीत दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. दुपारच्या सुमारास जवळपास पंधरा मिनिटे विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची चांगलीच धावपळ उडाली. शिर्डीसह राहता आणि कोपरगाव तालुक्यातील बहुतांशी भागातही मुसळधार पाऊस बरसला. मात्र या अवकाळी पावसामुळे शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलंय.


साताऱ्यात झाडं उन्मळून पडली


सातारा जिल्ह्यात तापमान ४२ अंशावर गेलं असतानाच सातारा जिल्ह्यात कोरेगाव खटाव कराडसह कोयना परिसरात पावसानं हजेरी लावली. वादळी वा-यासह आलेल्या पावसानं अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती. तर कोरेगाव तालुक्यात नागझरी, वाठार किरोली आर्वी भागात सुमारे २ तास मुसळधार पाऊस झाला. नागझरी भागातील वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे वाऱ्यानं उडून गेले. कराड बसस्थानकात पत्रा अंगावर पडल्यानं दोन प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान, तळमावल्यात रस्त्यावर पाणी साचल्यानं दलदल निर्माण झाली होती. पोलीस, प्रवासी आणि स्थानिक तरुणांच्या तत्परतेमुळे रस्त्यावरील पडलेली झाडं बाजुला करण्यात आल्यानं वाहतूक पूर्ववत करण्यात आली.


यवतमाळमध्ये वादळ वारं...


यवतमाळ जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून वादळी वा-यासह जोरदार पाऊस सुरु आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक घरांवरील छप्पर उडून गेलीयेत...तर मोठी झाडं उन्मळून पडल्य़ानं वाहतूकीला अडथळा निर्माण झालाय. तर अनेक गावांचा वीजपुरवठा खंडीत झालाय. सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या सरींनी पिकांचही मोठं नुकसान झालंय. दारव्हा, झरी, कळंब, बणी, मारेगाव या तालुक्यातील गावांना पावसाचा तडाखा बसलाय.


धुळ्यात वीज पुरवठा खंडीत


धुळे शहरात काल सकाळी वादळी वा-यासह पावसानं हजेरी लावली.. वादळामुळे अनेक ठिकाणचे होर्डींग्ज उडून इतरत्र जावून पडले तर शेकडो घरांचंही या अवकाळी पाऊसाने नुकसान केलंय. या पावसामुळे अर्ध्या शहराचा वीज पुरवठा खंडीत झालाय. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती, पेठ विभाग, जुन्या धुळे परीसरासह अनेक ठिकाणी गेल्या बारा तासापासून विज पुरवठा खंडीत आहे..त्यामुळे ऐन उन्हाळ्यात विजपुरवठा खंडीत झाल्यानं नागरीक उकाड्यानं हैरण झालेत.


कोकणालाही झोडपलं...


असलेल्या अवकाळी पावसानं कोकणालाही  चांगलंच झोडपून काढलं. या पावसामुळे शेतक-यांचं मात्र चांगलंच नुकसान झालं. गेले दोन दिवस रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसानं भात पिकाचं नुकसान केलंय. मेमध्ये शेतक-यांची भातकापणीची लगबग सुरु असते. उन्हाळी भात शेती पीक मोठ्या संख्येनं लाखो हेक्टरवर शेतकरी पीक घेतात. त्यात अवकाळी पावसानं शेतक-याची चिंता वाढवलीय. जिल्ह्यात कापणी आणि झोडणीची कामं सर्वत्र सुरु आहेत. शेतावरच उघड्यावर भाताची झोडणी करण्यात येत असल्यानं शेतात कापणी केलेलं भात पीक पाऊसाच्या पाण्यानं भिजून गेलंय. तर शेतात उभं असलेलं पीक हे काही ठिकाणी सोसाट्याच्या वा-यानं आडवं झालंय. असाच अवेळी पाऊस पुढचे काही दिवस मुक्कामी राहिला तर शेतक-याच्या हातातोंडाशी आलेलं पीक नष्ट होण्याची चिंता शेतक-यांना सतावतेय.