मुंबई : मुसळधार पावसानं मुंबापुरीला अक्षरशः झोडपून काढलंय. सकाळपासून मुंबईच्या प्रत्येक भागात जोरदार पाऊस होतोय. मान्सूनचं आगमन झाल्यापासून पावसाचा जोर सर्वाधिक म्हणावा लागले. दुपारच्या सुमारास पूर्व आणि पश्चिम उपनगरात झालेल्या पावसानं संपूर्ण जनजीवनचं कोलमडलं. सायनजवळ रेल्वे ट्रॅकवप पाणी आलं. तर हार्बर लाईनवर लोकल बंद पडल्यानं वेळपत्रकाचे तीन तेरा वाजले. इकडे मध्य आणि दक्षिण मुंबईतल्या बहुतांश सखल भागात पाणी साचलं. हिंदमाता, गांधी मार्केट, माहेश्वरी उद्यान आणि सायनमध्ये पाणी भरलं. यामुळे रस्ते वाहतुकीचाही बोजवारा उडाला. हवामान खात्यानं पुढचे ४८ तास पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 


समुद्रकिनारी गर्दी... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत जोरदार पाऊस बरसत होता. त्याचवेळी समुद्रात भरतीही होती. त्यामुळे मुंबईतल्या समुद्रकिना-यावर उंच लाटा धडकत असलेल्या पाहायला मिळाल्या. ऐन विकएन्ड आणि बरसणारा पाऊस, त्यातच समुद्रातली भरतीची वेळ. त्यामुळे मुंबईकरांनी समुद्रकिनारी गर्दी केली होती. 


सायन प्रतिक्षानगरमध्ये पाणी 


सायन प्रतीक्षानगरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय. रस्त्यानं येता जाताना नागरिकांचे हाल होतायत. मोठ्या पावसानंतर नेहमीच  रस्त्यावर पाणी साचतं. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळं सोसायट्यांमध्येही पाणी साचलंय. यामुळे नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. मात्र, महापालिकेकडून कुठलीही उपाययोजना केली जात नाही.


वसईत संततधार सुरूच 


उत्तर मुंबईतल्या वसईमध्ये पावसाची दमदार हजेरी लावलीय. १२ तासांत वसईमध्ये तब्बल २०७ मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. पावसामुळे वसईतला सन सिटी गास रोड पाण्याखाली गेला. त्यामुळे भूईगाव-निर्मळ-कळंब इथे जाणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर कारवा लागतोय. नालासोपारातही संततधार सुरुच आहे. अनेक सखल भागांत पाणी साचलंय. नालासोपारा आणि आजूबाजूच्या परिसरात व स्टेशन जवळ पाणीच पाणी झालंय. त्यामुळे रेल्वे १० ते १५ मिनिटं उशिरानं धावतायत. आचोळे रोड, तुळींज पोलीस ठाणे महेश पार्क, स्टेशन रोड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय.


पवई तलाव भरला


मुंबईत पावसाचा जोर कायम असल्यानं उपनगरातील पवई तलाव ओसंडून वाहू लागलाय. सुमारे ५२० एकरमध्ये असलेला पवई तलाव ओसंडून वाहू लागला. जेव्हा तलाव ओवर फ्लो होतो तेव्हा तरुणाई आणि लहान मुलं सुट्टीच्या दिवशी याठिकाणी येउन मजा लुटतात, मात्र यावर्षी सुरक्षेचा उपाय  म्हणून पाण्यात जाण्यापासून रोखण्यात येतंय. पवई तलाव हा मुख्यतः प्रेक्षणीय आणि पर्यटकांना आकर्षित करणारा तलाव आहे.  


नवी मुंबई


नवी मुंबईमध्ये दिवसभर पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला. दुपारपासून मुसळधार पाऊस बरसला असून आतापर्यंत ७६.४५ मिमि पावसाची नोंद करण्यात आली. 


कल्याण - डोंबिवली


कल्याण-डोंबिवलीमध्ये सकाळपासून संतत धार पाऊस पडतोय. अधूनमधून जोरदार सरी बरसतायत. पावसानं कल्याण आणि डोंबिवलीकरांना चांगलचं झोडपलंय. 


ठाणे


ठाण्यातही सकाळपासून पाऊस जोरदार बरसला. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळालं. दरम्यान पावसाच्या तडाख्यामुळे ठाण्यातल्या घोडबंदर रोडवरची संरक्षक भिंत कोसळली. इथल्या रुनावल इस्टेट आणि मॉल यांच्यामधली ही संरक्षक भिंत होती. ही भिंत कोसळल्यानं रुनावल इस्टेटमधल्या ९ वाहनांचं नुकसान झालं. 


वसईत दुर्घटना


वसईत भिंत कोसळुन दोन तरुणांचा जागीच मृत्यु झाला. मुसळधार पावसात भिंतीचा आधार घेऊन दोन्ही तरुण ऊभे होते. अचानक भिंत त्यांच्या अंगावर कोसळली.  वसई पुर्व फ़ादरवाडी गोखीवरेमधील घटना ही दुर्घटना घडल. स्वप्नील दिलिप सावंत  आणी सनि भद्रसिंग रावत असं मयत तरुणाचं नाव आहे.  या विरोधात वालिव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 


भुशी डॅम भरला


दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने लोणावळ्यातील पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षण असलेले भुशी धरण काठोकाठ भरलंय. धरणाच्या पायऱ्यांवरून आता हळूहळू पाणी बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सकाळपासून मागील ३३ तासामध्ये येथे एकूण २४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण भरल्याची या सुखद बातमीने लोणावळा शहरात पर्यटकांची संख्या वाढणार आहे. यामुळे येथील व्यवसायिकामध्ये आनंदाचे वातावरण आहे.