मुंबई : आपल्या जिल्ह्यांत, आपल्या गावांत पावसाची स्थिती काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल... बुधवार आणि गुरुवारी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत पावसानं काय काय उलथा-पालथ करून टाकलीय... पाहुयात... 


सांगली - बामणी गावाचा संपर्क तुटला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगली आणि मिरज शहराजवळ असणाऱ्या ओढ्याला पूर आल्यानं बामणी गावचा संपर्क पूर्णपणे तुटलाय. ओढ्यावरील रस्ता पाण्यात गेल्यामुळं तब्बल दोन हजार लोकं गावात अडकून पडली आहेत. संपूर्ण गावाला पाण्यानं वेढल्यामुळं लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. लोकांना जीव मुठीत घेऊन मोडक्या-तोडक्या होडीतून प्रवास करावा लागतोय. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर पाठोपाठ सांगलीला मुसळधार पावसानं झोडपलंय. 


सांगली - कृष्णा, वारणेचं पाणी गावांत


सांगली जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. वारणा धरण ५३ टक्के तर कोयना ३७ टक्के भरलंय. जिल्ह्यातील चार तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून, शिराळा तालुक्यातील तीन पूल पाण्याखाली गेलेत. कृष्णा-वारणा नद्यांचं पाणी पात्र सोडून बाहेर आलंय. औदुंबर येथील दत्त मंदिरात कृष्णेचं पाणी शिरलंय. सांगलीत आरवाडे आणि सूर्यवंशी प्लॉट या परिसरांत पाणी शिरल्यानं नागरिकाचं स्थलांतर करण्यात आलंय.


कोल्हापूर - पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी


कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. अनेक नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरल्यानं आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने मदतीचे काम सुरू केले आहे. रात्री उशीरा एनडीआरएफची टीम दाखल झाली असून मदत कार्याला सुरूवात  झालीय. पंचगंगा नदीची धोका पातळी ४३ फूट असून सध्या ४४ फूट आठ इंचावर वाहत आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर नद्यांची आहे. पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुण्यातून एनडीआरएफचे ४० जवान आणि सहा बोटींसह कोल्हापुरात रात्रीच दाखल झालेत.


नाशिक - तिघांची सुखरुप सुटका 


नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या तिघांची सुखरुप सुटका करण्यात आलीय. निफाड तालुक्यातल्या कुंदेवाडीजवळ बंधाऱ्यालगत असलेल्या दत्त मंदिरात हे तिघे जण अडकले होते. या मंदिराला पाण्याचा वेढा पडला असल्यामुळे तिघे जण अडकले होते. या तिघांना वाचवण्यासाठी बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं. मात्र दिवस मावळल्यामुळे या बचावकार्यात अडथळे येत होते. अखेर पहाटे तीनच्या सुमारास या तिघांची सुखरुप सुटका करण्यात यश आलं. 


गोदावरीचा पूर ओसरतोय


दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने गोदावरी दुथडी भरून वाहत होती. मात्र आता पावसाचा जोर कमी झाल्यानं गोदावरीचा पूर ओसरायला सुरवात झालीय. रामकुंड परिसरातील पाण्याखाली गेलेली मंदिरं आता दिसू लागलीय. गोदावरीचं हे रूप डोळ्यात साठविण्यासाठी आणि पाण्याची मजा लुटण्यासाठी याठिकाणी नाशिककरांची गर्दी वाढू लागलीय.


पुणे - खडकवासलाच्या पाणीपातळीत वाढ


गेले काही दिवस सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरण ९० टक्के भरलंय. धरणाच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ होत असल्यानं या धरणातून ४२८० क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं. सकाळी ११ च्या दरम्यान धरणाचे ४ दरवाजे उघडण्यात आले.  खडकवासल्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचं प्रमाण टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात येत आहे. नदीत सोडण्यात आलेलं पाणी उजनीला जाऊन मिळणार आहे. पुण्यामध्ये जून महिना कोरडा गेला. मात्र जुलैच्या सुरवातीपासूनच पावसानं जोर धरलाय. खास करून धरण क्षेत्रात संततधार सुरू आहे. पानशेत, वरसगाव, टेमघर तसेच खडकवासला या ४ धरणांमधून पुण्याला पाणीपुरवठा होतो. सध्याच्या पावसामुळे या धरणसाखळीतील पाणीसाठा ४० टक्क्यांवर गेलाय. खडकवासला हे या साखळीतील सर्वात खालचं आणि सर्वात लहान धरण आहे. ते लगेचच भरल्यामुळे पाणी सोडण्याची वेळ आलीय. मात्र पाऊस असाच सुरू राहिला तर इतर धरणं भरायलाही  वेळ लागणार नाही. 


नांदेड - विष्णुपुरी धरण भरलं 


नांदेडमधील विष्णुपुरी धरण ९० टक्के भरलंय. पाण्याची आवक सुरूच असल्याने धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आलेत. नांदेड जिल्ह्यात तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरण भरलंय. विष्णुपुरी धरणाने गेल्या महिन्यात तळ गाठला होता. महिनाभरातच धरण भरले. याच धरणातून नांदेड शहराला पाणी पुरवठा केला जातो. शिवाय सिंचनासाठीदेखील धरणातील पाण्याचा उपयोग होतो. 


अकोला - अकोट, तेल्हाराचा संपर्क तुटला


गेल्या चोवीस तासांत अकोला जिल्ह्यात विक्रमी पाऊस झालाय. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालीय. अकोला जिल्ह्यात मागच्या चोवीस तासांत तब्बल ६५५.६० मिलीमीटर पाऊस झालाय. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पूर्णा नदीला महापूर आलाय. पूर्णा नदीला पूर आल्यामुळे अकोला-अकोट मार्गावरील गांधीग्राम येथील पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे अकोट आणि तेल्हारा तालुक्याचा गेल्या चोवीस तासांपासून जिल्हा मुख्यालयाशी संपर्क पूर्णपणे तुटलाय.  जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात मागच्या चोवीस तासांत १४० मिलीमीटर पाऊस झालाय. तर बार्शीटाकळी ११८, बाळापूर १०१, पातूर १३३, अकोट ६३, अकोला ६२.६ आणि तेल्हारा ३८ मिलीमीटर एवढा पाऊस झालाय. याशिवाय जिल्ह्यातील अकोट-हिवरखेड, जामठी-लाखपुरी, अकोला-दर्यापूर हे मार्गही पुरामुळे बंद आहेत. 


बुलडाणा - संग्रामपूर, जामोदचा संपर्क तुटला


बुलडाणा जिल्ह्यात गेल्या ४ दिवसांपासून सुरु असलेल्या सतंतधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या पूर्णा नदीला मोठा पूर आलाय. जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्याचा संपर्क तुटला आहे. पूर्णा नदीच्या शेगाव संग्रामपूर रोडवर खिरोडा येथे असलेल्या पुलावरून ३ ते ४ फूट पाणी आलंय. संग्रामपूर तालुक्याचा संपर्क तुटलाय. तिकडे नांदुरा-जळगाव जामोद रस्त्यावरच्या येरळी पुलावरून ७ ते ८ फुटापर्यंत पानी आलंय. त्यामुळे जळगाव जामोद तालुकाही संपर्कहीन झालाय. 


गडचिरोली - वैनगंगेत बुडाली बोट 


गडचिरोली जिल्ह्यात वडसा तालुक्यातल्या सावंगी येथील वैनगंगा नदीपात्रात बोट बुडाली. बोटीमध्ये असलेल्या १२ पैकी  १० लोकांना वाचवण्यात रेस्क्यू टीमला यश आलंय. उर्वरीत दोघांचा शोध अजूनही सुरूच आहे. प्रवासी  चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज येथील रहिवासी आहेत. नावेवर ८ ते १० भाजी विक्रेते, विद्यार्थी आणि 1 दुचाकी वाहन घेऊन नाव निघाली होती. ही नाव किना-यापासून 15 फुटावर येताच नाव अनियंत्रित झाल्याने नाव उलटलीं.  यातील काही प्रवासी पोहून धाडसाने काठावर पोचले तर काहींना पोलिसांनी बाहेर काढले. दरवर्षी पावसाळयात सावंगी गाव पुराने वेढलेले असते. काही वर्षांपूर्वी या गावांतील काही नागरिकांचे नदीपलिकडील सावंगी गावानजीक पुनर्वसन करण्यात आले. परंतु लाडज येथील जमीन सुपीक असल्याने अजूनही बरेचसे कुटुंब जुनी लाडज येथेच वास्तव्य करतात. तेथील नागरिकांना पावसाळ्यात बाहेर पडण्यासाठी नाव हेच साधन असते.


यवतमाळ - शेतीला धोका  


यवतमाळ जिल्ह्यात गेल्या ५ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. पावसाचा जोर अद्यापही कायम असून नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहे. अनेक प्रकल्पात मोठय़ा प्रमाणात जलसंचय झाला आहे. तर शेतांमध्ये पाणी साचल्यानं पिकांना धोका निर्माण झालाय. शेतीची कामंही ठप्प पडली आहेत. पैनगंगा नदीला पूर आल्यानं तीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.


रत्नागिरीत संततधार


रत्नागिरीत पावसाची कालपासून संततधार सुरु आहे. त्यामुळे अनेक नद्यानी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुरामुळे पाणी शेतात घुसलय नदी किनारी सतर्क तेचा इशारा दिलाय राजापुरमध्ये बाजार  पेठेत पाणी घुसलय त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालय मात्र सकाळ पासून पावसाचा जोर कमी आहे मात्र रात्री पडलेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत