पुणे : राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने यावर्षी पाऊसमान कसं असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अॅग्रोवन या कृषी दैनिकाने दिलेल्या बातमीनुसार, यंदा राज्यात १०२ टक्के पावसाची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र जून, जुलै महिन्यात पावसात काही ठिकाणी खंड पडण्याची शक्यता आहे, खंड लहान असेल तर शेतकऱ्यांना मशागतीसाठी मदत होईल, मात्र खंड मोठा पडला तर शेतकऱ्यांसाठी ही चिंतेची बाब असेल.


हा अंदाज कृषी विद्यापीठांच्या वेधशाळांच्या माहितीवरुन वर्तवण्यात आला आहे. 


ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र साबळे यांनी हा अंदाज वर्तवला असल्याचं अॅग्रो वनने म्हटले आहे.


डॉ. रामचंद्र साबळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत हा अंदाज सादर केला. या अंदाजानुसार राज्यात सरासरीच्या १०२ टक्के पाऊस होणार असून कमी दिवसांत अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.


शेतकऱ्यांसाठी मात्र जून, जुलै महिन्यासाठी थोडीशी चिंतेची बाब आहे. कारण जून महिन्यात काही काळ पावसात खंड पडू शकेल. मान्सूनच्या कालावधीत 'एल निनो' या वातवरणीय घटकाचा प्रभाव कमी राहणार आहे. यामुळे जुलै महिन्यात तो आणखी कमी होईल. परंतु जून आणि जुलै महिन्यात पावसात खंड पडेल, असे साबळे यांनी म्हटले आहे. 


'पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्य़ांत पाऊस कमी पडतो. त्या ठिकाणी असे घडण्याची शक्यता अधिक आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ात चांगला पाऊस अपेक्षित असून खंडाचा कालावधीही कमी असेल. ज्या ठिकाणी सरासरीच्या वर पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तिथे खंड कमी पडेल.


कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. जिथे कमी पाऊस अपेक्षित आहे तिथे पावसात खंड पडू शकतो, असं डॉ. साबळे यांनी म्हटलं आहे.


अॅग्रो वनमध्ये विभागीय अपेक्षित सरासरी खालील प्रमाणे देण्यात आली आहे, कृषी विद्यापीठांच्या वेधशाळांनी हा अंदाज वर्तवला आहे.


पश्चिम विदर्भ ११६ टक्के


मध्य विदर्भ ११० टक्के


पूर्व विदर्भ १०७ टक्के


मराठवाडा १०९ टक्के


कोकण ९८ टक्के


उत्तर महाराष्ट्र १०२ टक्के


पश्चिम महाराष्ट्र ९७.१६ टक्के