लातूर : भीषण दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या लातूरचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धावता दौरा केला. मात्र या दौऱ्यातून त्यांना लातूरचा दुष्काळ कितपत समजला हा चिंतनाचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. 


१८ पाण्याच्या टाक्यांचे वितरण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठा गाजा-वाजा करून मनसे प्रमुख राज ठाकरे आज दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यासाठी सकाळी लातूर स्थानकावर दाखल झाले. यावेळी स्थानकावर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर लातूरच्या शासकीय विश्रामगृहावर त्यांनी ३० हजार लिटरच्या १८ पाण्याच्या टाक्यांचे वितरण केले. 


१२ रुपयात घरपोच पाणी


याशिवाय मनसे तर्फे वाटप होणाऱ्या २ पाण्याच्या टॅंकरचे उद्घाटनही त्यांनी यावेळी फित कापून केले. तर मनसे शहराध्यक्ष किरण चव्हाण यांनी सुरु केलेल्या १२ रुपयात घरपोच पाण्याचा जारचा शुभारंभ त्यांनी यावेळी केला. हे सर्व त्यांनी एकाच ठिकाणी म्हणजे लातूरच्या शासकीय विश्रामगृहावर केले. 


 दुष्काळ दौरा होता की...


त्यानंतर राज ठाकरे हे एका खटल्यासंदर्भात निलंगा कोर्टात हजर राहण्यासाठी गेले. तिथून पुढे ते उस्मानाबाद जिल्ह्याकडे रवाना झाले. एकूणच भीषण दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या लातूरचा त्यांनी दौरा तर केला. मात्र या दौऱ्यातून त्यांना लातूरचा दुष्काळ कितपत समजला हा चिंतनाचा विषय आहे. त्यामुळे हा खरच दुष्काळ दौरा होता की निलंगा कोर्टात हजर राहण्यासाठी केलेले नियोजन, अशी चर्चा त्यांचे कार्यकर्ते यावेळी करत होते.