रामनवमी निमित्तानं दुमदुमली साईंची नगरी!
शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला सुरुवात झालीय. या उत्सवासाठी साईभक्तांची पावलं शिर्डीच्या दिशेनं निघालीत.
शिर्डी : शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला सुरुवात झालीय. या उत्सवासाठी साईभक्तांची पावलं शिर्डीच्या दिशेनं निघालीत.
साईंची नगरी शिर्डी दुमदुमलीय... राज्यातूनच नाही तर देशभरातून लाखो भाविक शिर्डीत दाखल झालेत... कारण शंभर वर्षाची परंपरा असलेल्या आणि खुद्द साईबाबांनी सुरु केलेला रामनवमीचा उत्सव सुरु झालाय. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी भाविक पायी पालख्यांच्या माध्यामातून शिर्डीत दाखल झालेत. साई भक्तांसाठी प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आलीय. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंदिर परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी मंडप उभारण्यात आलेत. जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आलीय.
रामनवमी निमित्त साई मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आलीय. फुलांची सजावटही पाहायला मिळतेय. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईच्या द्वारकामाई मंडळाने परिसरात साईसच्चरित्र महाद्वाराचा आकर्षक देखावा उभारलाय. एकूणच रामनवमीनिमित्त शिर्डी भक्ती रसात न्हाऊन गेल्याचं पाहायला मिळतंय.