अमरावतीमधील तूर खरेदी केंद्रे पूर्ववत सुरु
शेतक-यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि जिल्हाधिका-यांची मध्यस्थी यामुळे जिल्ह्यातल्या अचलपूर आणि चांदूरबाजार इथली दोन तूर खरेदी केंद्रे पूर्ववत सुरु करण्यात आली आहेत.
अमरावती : शेतक-यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि जिल्हाधिका-यांची मध्यस्थी यामुळे जिल्ह्यातल्या अचलपूर आणि चांदूरबाजार इथली दोन तूर खरेदी केंद्रे पूर्ववत सुरु करण्यात आली आहेत.
नाफेडच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चांदूरबाजार आणि चांदूर रेल्वे या चार केंद्रांवरती तूर खरेदी केली जात होती. बाजारात ऐन हंगामात व्यापा-यांकडून सरासरी ४ हजार २०० रुपये प्रति क्विंटल दराने तूर खरेदी करण्यात येत होती. त्याचवेळी या शासकीय खरेदी केंद्रातून शेतक-यांना किमान ५ हजार ५० रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळत होता.
शेतक-यांनी शासकीय खरेदी केंद्रांवर गर्दी केली होती. दरम्यान ही तूर शेतक-यांची नसून व्यापा-यांची असल्याची शंका घेत, नाफेडनं अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चांदूरबाजार आणि चांदूर रेल्वे या चार खरेदी केंद्रांवरची खरेदी बुधवारपासून बंद केली होती.
मात्र नाफेडची तूर खरेदी सुरु राहिलच याची काहीच शाश्वती नसल्यानं, शेतक-यांच्या डोक्यावर अजूनही टांगती तलवार असल्याचं चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.