जळगाव : गेल्या काही दिवसांपासून आरोपांच्या कचाट्यात असलेले राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे जळगावातून गायब झालेत. भोकरधन इथं त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. खडसेंना भेटल्यानंतर सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर यांच्यासह दानवे हेलिकॉप्टरनं परळीकडे रवाना झाले. मात्र खडसे कुठे गेलेत याची कुणालाही माहिती नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कालपर्यंत खडसे मुक्ताईनगरमधल्या फार्म हाऊसमध्ये होते. माध्यमांच्या कुठल्याही प्रतिनिधीशी बोलण्यास तयार नसलेले खडसे त्यांच्या मतदार संघातील समर्थकांना मात्र भेट देत होते. आता मात्र ते जळगावातून निघून गेलेत. ते मुंबईत आहेत की दिल्लीत की नागपुरात याची आता चर्चा रंगलीये.


भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील कारवाई तूर्तास टळलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी रात्री दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह आणि वरिष्ठ भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. 


खडसे प्रकरणी त्यांनी पक्षश्रेष्ठींना आपला अहवालही दिला. खडसे यांच्यावर तूर्तास कारवाई नको, असा निर्णय श्रेष्ठींनी घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे खडसेंना तात्पुरतं अभय मिळालं असलं तरी त्यांच्यावरील टांगती तलवार मात्र कायम आहे. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर खडसेंवर कारवाई केल्यास त्याचे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे ही निवडणूक झाल्यानंतरच खडसेंबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं समजतंय.


एकनाथ खडसे एकटे नसल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. पक्ष खडसे यांच्या पाठीशी आहे. भाजप हा एक परिवार आहे. खडसेंबाबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भूमिका स्पष्ट केलीये. खडसे स्वतःदेखील भूमिका मांडतात, असं मुनगंटीवार म्हणाले.