सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या विवाहाचा थाट, CMसह डझनभर मंत्र्यांची उपस्थिती
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा विवाहसोहळा थाट शुक्रवारी इस्लामपूरमध्ये पाहायला मिळाला.
सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा विवाहसोहळा थाट शुक्रवारी इस्लामपूरमध्ये पाहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील डझनभर मंत्री, भाजपचे आमदार, सांगलीतील सर्वपक्षीय नेते सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे, कष्टांकडे सरकारचे लक्ष वेधत राज्यात मंत्रिपदापर्यंत मजल मारणारे सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या विवाहाची चर्चा सुरु आहे. लग्नसोहळ्यासाठी इस्लामपूरमधील १५ हजार चौरस फुटांचा हॉल सुशोभित करण्यात आला होता. विवाहस्थळी वादनासाठी पोलिसांचे बॅण्ड पथकही सज्ज होते.
राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, महादेव जानकर, दिवाकर रावते, विजय शिवतारे यांचा समावेश आहे. तर सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते पंतगराव कदम, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे स्थानिक आमदार आणि नेते जयंत पाटील हे सुद्धा या विवाहसोहळ्यासाठी उपस्थित होते. भाजपचे सांगली जिल्ह्यातील आमदार आणि नेत्यांनी विवाह सोहळ्यासाठी उपस्थिती लावली.