यवतमाळ : बळीराजाची आत्महत्या हा महाराष्ट्राच्या प्रत्येक समाजमनाला लागलेला एक जिव्हारी चटका असतो. 19 मार्च 1986 ला पहिल्यांदा एक फास आवळला गेला आणि त्या दुष्टचक्रातून अजुनही बळीराजा सुटलेला नाही. चिलगव्हाणच्या त्या पहिल्या आत्महत्येच्या कटू आठवणीनिमित्त रविवारी अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.
 
शेतकऱ्यांच्या आत्महत्या... 31 वर्षांपासून सुरु झालेलं हे दृष्टचक्र... १९ मार्च १९८६ रोजी महाराष्ट्रातील पहिली जाहीर शेतकरी सहकुटुंब आत्महत्या यवतमाळच्या चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी केली होती. प्रगतीशील शेतकरी असणाऱ्या साहेबरावांना कालांतराने कर्जाचा बोझा वाढल्यामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घ्यावा लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अस्वस्थ असलेल्या साहेबरावांनी पत्नी मालती व चार अपत्यांना घेऊन पवनार आश्रमात जेवणात विषारी औषध कालवून आत्महत्त्या केली. मृत्यपूर्वी लिहून ठेवलेल्या पत्रात 'शेतकरी म्हणून जगणे कठीण झाले आहे' असे नमूद केलं. ते पत्र समस्त शेतकरी समाजाची दु:खद कैफियत सांगणारे होते. साहेबराव यांच्या आत्महत्येने सारा महाराष्ट्र हादरून गेला. या दुर्दैवी घटनेला ३१ वर्ष पूर्ण झालीत.


राज्यभर अन्नत्याग आंदोलन...


शेतकऱ्यांची आजतागायत असलेली व्यथा मांडत रविवारी १९ मार्चला राज्यभर अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकरी नेते अमर हबीब स्वतः चिलगव्हाण येथे उपोषणाला बसणार असून आंदोलनाला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे.


आताही बळीराजा नापिकी, कर्ज आणि सरकारी अनास्थेचा बळी ठरतोय. या पार्श्वभूमीवर देशभरातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याविरूध्द सहवेदना व्यक्त करण्यासाठी राज्यभर शेतकऱ्यांवर प्रेम करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक रविवारी अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजत असताना रावसाहेबांच्या स्मृतिदिनाला राजकीय महत्त्वही प्राप्त झालंय.
 
चिलगव्हाणचा साहेबरावांचा वाडाही विकला गेलाय... सरकारची कुठलिही मदत परिवाराला मिळालेली नाही... गावात गुंठाभर जमीनही शिल्लक नाही... त्यांचे बंधू गाव सोडून गेलेत... रावसाहेब आणि त्यांचं कुटुंब या राज्यातल्या शेतकऱ्याची स्थिती दर्शवणारं प्रातिनिधिक उदाहरण... 31 वर्षांनंतरही परिस्थिती बदललेली नाही, हेच इथलं भयाण वास्तव आहे...