जळगाव :  खानदेशातील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या तापी नदीला सूर्यकन्या म्हटलं जातं. तापी नदीतून मागील चार दिवसापासून भरमसाठ वाळू उपसा सुरू आहे. 


सूर्यकन्येला मरणयातना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यकन्येला मरणयातना दिल्या जात आहेत. यामुळे जिल्ह्याच्या भविष्यावर याचा गंभीर परिणाम होणार आहे. सर्वात जास्त आणि भयानक वाळू उपसा अमळनेर तालुक्यातील सावखेडा तापी नदीच्या पात्रातून सुरू आहे.


सूर्यकन्या समजल्या जाणाऱ्या तापीनदीवर वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असताना, अधिकारी काहीही कारवाई करत नाहीत, हे विशेष आहे. रात्रंदिवस हा उपसा सुरू असतो.


'तर अधिकाऱ्यांची कॉलर धरू...'


वाळू उपशावर मागील वर्षीही हीच भूमिका दिसून आली होती, तेव्हा अधिकारी काय बोलतील, बोलतील त्यांची कॉलर धरू, पैसे घेणाऱ्यांची आमच्याकडे यादी आहे, या प्रकारची भाषा काही वाळू माफियांनी पैशांच्या जोरावर केली असल्याची चर्चा होती. त्यामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या मनात वाळू माफियांविषयी भीती आहे.


महसूल, पोलीस, आरटीओ सुस्त


या वाळू उपशाचं चित्र एवढं बिभत्स आहे की, महसूल, पोलीस आणि आरटीओ यांची अंतर्गत साखळी असल्याशिवाय, एवढी मोठी बेकायदेशीर वाहतूक होऊच शकत नाही, अशी चर्चा सर्वसामान्य लोकांमध्ये आहे. धुळ्याचे आरटीओ यावर अनेकदा विचित्र उत्तर देताना दिसतात. महसूल खात्याने त्यांना जास्त वजनाच परमिट देऊ नये, असं उत्तर दिलं जातं, यावरून अंतर्गत साखळी असल्याची शक्यता आणखी दाट होते.


अमळनेर तालुक्याला पुढील ५० वर्षासाठी फटका


या वाळू उपशामुळे तापीकाठच्या गावातील विहिरीचं पाणी झपाट्याने खाली जात आहे. यापुढे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती आणखी भयानक होण्याची चिन्हं आहेत. ही भर पुढील ५० वर्ष भरून निघणार नाही, पाण्याची पातळी खाली गेल्याने अमळनेरसारखा कोरडवाहू तालुका आणखी बकाल होणार असल्याचं जाणकारांनी म्हटलं आहे.


कंत्राट नाही तर बिनधास्त


निसर्गाला आव्हान दिल्यासारखा हा वाळू उपसा सुरू आहे. विशेष म्हणजे कोणतंही कंत्राट निघालेलं नसतानाही हा वाळू उपसा सुरू असल्याची चर्चा आहे.  


भलेमोठे वजनदार, धोकादायक डंपर


वाळूच्या डंपरचा आकारही ट्रॅकच्या कठड्याच्या दुप्पट आहे, त्यामुळे अमळनेर-चोपडा रस्ता खराब होतोय, या रस्त्याची क्षमता ८ टन वजनाच्या वाहनांसाठी असताना, हे प्रमाण वाळूच्या डंपरमुळे ४ पटावर गेलं आहे. अमळनेर-जळोद-हातेड हा रस्ता यापूर्वी बेकायदेशीर वाळू वाहतुकीने खराब झालाय, आता अमळनेर-चोपडा रस्त्याची वाट लावण्यात येत आहे.


प्रांत गप्प का?


तहसिलदार आणि प्रांत मात्र मूळ गिळून गप्प बसले आहेत. प्रांत यांच्यावर काही दिवसापूर्वी हल्ला झाल्याची चर्चा होती, या घटनेचा गावभर बोभाटा झाला. मात्र प्रांत संजय गायकवाड यांची कार्यक्षमता वाळू माफियांविरोधात दिसून येत नाही. ते यापूर्वी मराठवाड्यात होते, आता खानदेशात कार्यरत आहेत. अधिकारी हे आपल्या गावाच्या जवळ निव्वळ आराम करण्यासाठी, बदल्या करत असल्याची चर्चा आहे.


बदल्यांचे आकडे पूर्ण करण्यासाठी मरणयातना


उत्तर महाराष्ट्रात महसूल, पोलीस आणि परिवहन विभागातील इच्छूक ठिकाणी जावू इच्छीणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे रेट आणखी वाढणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. वाळू उपसा पट्ट्यात येणाऱ्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या १० लाखाच्या खाली होत नसल्याचंही सांगितलं जातंय, असं चित्र असल्याने सर्रास वाळू वाहतूक सुरू असल्याचं उघडपणे बोललं जातंय. सर्वसामान्य लोकांनाही प्रश्न पडतोय, एकाच वेळेच २५ ते ३० डंपरचे, एवढे ताफे कसे वाढले. 


लोकप्रतिनिधी की अधिकारी?


लोकप्रतिनिधी आणि अधिकारी या प्रकरणी काहीही बोलत नसल्याने, वाळू माफियांच्या हाताला नेमके अधिकारी लागले आहेत की लोकप्रतिनिधी याविषयी जनतेत मोठा संभ्रम आहे. म्हणून जे लोकप्रतिनिधी यात सामिल नसतील त्यांनी जाहीर स्पष्टीकरण देण्याची, तर जे अधिकारी सामिल नसतील त्यांनी कारवाई करण्याची गरज आहे.