रवींद्र कांबळे, सांगली : दहावीच्या परीक्षेत पैकीच्या पैकी १०० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी अनेक आहेत... पण अगदी कट टू कट म्हणजे ३५ टक्के गुण मिळवणं हे येरागबाळ्याचं काम नाही...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठीत ३५... हिंदीत ३५... इंग्लिशमध्ये ३५... गणितात ३५, विज्ञानात ३५ आणि समाजशास्त्रात ३५... एकूण गुण २१० आणि एकूण टक्केवारी फक्त ३५ टक्के... 


अगदी कट टू कट काठावर पास होणारा हा विद्यार्थी आहे मिरजेचा प्रकाश महालिंग मिशी... मल्लिकार्जून एज्युकेशन सोसायटीच्या कन्नड आणि मराठी माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या प्रकाशनं ही अजब गजब कामगिरी केलीय... त्यामुळं रातोरात तो फेमस झालाय. कुणी मिठाई भरवून, तर कुणी हारतुरे देऊन त्याचं कौतुक करतंय. प्रकाश मात्र या प्रकारानं भांबावून गेलाय.


मुलानं शिकण्याऐवजी काम करावं, अशी वडिलांची इच्छा... तर काहीही करून मुलानं दहावी पास व्हावं, ही त्याच्या आईची जिद्द... काठावर का होईना, प्रकाश पास झाला. त्यामुळं त्याच्या आईचा आनंद गगनात मावेनासा झालाय.


प्रकाशच्या घरची परिस्थिती अगदी बेताची आहे. परीक्षेचा फॉर्म भरायलाही त्याच्याकडे पैसे नव्हते. शाळेच्या शिक्षकांनीच त्याची फी भरली आणि त्यानं ३५ टक्क्यांनी पास होण्याचा हा हटके विक्रम केला.


दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून खट्टू झालेले अनेकजण असतील. पण ३५ टक्क्यांनी पास झालेला हा प्रकाश मात्र भलताच प्रकाशझोतात आलाय.