सांगली : सांगलीतल्या बलात्कार पीडित महिलेनं आत्महत्या केल्याप्रकरणी आरोपी अमित कुरणेला 12 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मिरज न्यायालयानं अमितला 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगलीच्या गुन्हे अन्वेषण विभागानं कुरणेला मुंबईत अटक केली होती. अमितला कोर्टात नेताना मनसेच्या महिला कार्यकर्त्या स्वाती शिंदेंनी मारहाण केली. शिंदेंनी त्याचा शर्टही फाडला. अमित कुरणेसोबत त्याची आई सुनिता कुरणे आणि अण्णासाहेब कुरणेलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 


अत्याचार करणा-या आरोपीवर कारवाई होत नसल्यानं पीडित महिलेनं स्वतःचं जीवन संपवलं. आरोपीच्या शेतातील घरातच गळफास घेऊन महिलेनं आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या महिलेनं चिठ्ठीमध्ये आणि भिंतीवर आरोपीचं नाव लिहून ठेवलं. तिच्या आत्महत्येनंतर सुमारे तीनशे नागरिकांनी मिरज पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. 


विशेष म्हणजे या प्रकरणात महिन्याभरापूर्वीच गुन्हा दाखल झाला होता. मात्र आरोपीला अटक करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती.  उलट आरोपीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पीडित महिलेवरच पोलिसांनी शनिवारी खंडणीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.