सावंतवाडी : सिंधुदर्गात यावेळी सावंतवाडी नगरपालिका अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणार आहे. राज्यमंत्री दीपक केसरकर यांचा सावंतवाडी विभाग हा बालेकिल्ला मानला जातो मागच्या वेळी येथून १७ च्या १७ जागी केसरकर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी करून आणले होते. यावेळी केसरकर सेनेत आहेत त्यांना घेरण्यासाठी काँग्रेस भाजपचं नव्हे तर अंतर्गत त्यांच्या विरोधकांनीही व्युहरचना रचली आहे त्यामुळे केसरकर याना यावेळी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंधुदुर्गात होणाऱ्या चार नगरपालिका निवडणुकीत अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करत नारायण राणेंसह सर्वांना चीत केलं होतं. साहजिकच या निवडणुकीत उट्ट काढायची संधी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं चालून आलीय. सद्यस्थितीत केसरकरांना विरोधकांसह स्वकीयांचंही आव्हान पेलावं लागणारेय. 


सावंतवाडी मतदारसंघाची भाजपची जबाबदारी राजन तेली सांभाळत आहेत तर नारायण राणेंनी नीलेश राणेंकडे जबाबदारी सोपवली आहे. मात्र दोन्ही पक्षांचं म्हणावं तसं याठिकाणी वर्चस्व नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता आहे मात्र सर्व गणित दीपक केसरकर जुने सहकारी बबन साळगावकरांवर अवलंबून आहेत. आपण शिवसेनेत जाणार नाही ही त्यांची भूमिका केसरकरांसाठी अडचणीची ठरतेय. साळगावकर यांच्यासाठी काँग्रेसनंही फिल्डिंग लावलीय. ते खरंच काँग्रेसमध्ये गेल्यास दीपक केसरकर यांच्यासाठी अडचणीचं ठरू शकतं. 


सावंतवाडीत मागच्या वेळी केसरकर यांनी शंभर टक्के यश मिळवले आहे. साहजिकच यावेळी त्यांना गमावणंही परवडण्यासारखं नाही. युती केली तर पंचाईत अन् नाही केली तरी पंचाईत अशी त्यांची स्थिती आहे. उलट काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपकडे गमावण्यासारखं  असं काहीच नाही. त्यामुळे केसरकर कशी प्रतिष्ठाच राखतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे.