उल्हासनगरच्या निवडणुकीत `माझ्या नवऱ्याची बायको`चा एपिसोड
राज्यभरतातील जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत भाऊ- बहीण, नवरा-बायको, दीर-वाहिनी, बाप-मुलगी अश्या अनेक जोड्या निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळत आहेत
उल्हासनगर : राज्यभरतातील जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत भाऊ- बहीण, नवरा-बायको, दीर-वाहिनी, बाप-मुलगी अश्या अनेक जोड्या निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळत आहेत, मात्र उल्हासनगर मध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने आपली दुसरी बायको निवडणुकीच्या रिंगणात उतरवली आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दुसऱ्या बायकोच्या प्रचारासाठी पहिली बायको सुद्धा मैदानात आली आहे. या दोघीही हातात हात घालून प्रचार करत असल्याचे चित्र पॅनल 13 मध्ये पहावयास मिळत असल्यामुळे माझ्या नावरयाची बायको या सीरियलचा लाइव्ह एपिसोड नागरिकांना पाहायला मिळत आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणुकीत पॅनल 13 मध्ये ओबीसी जागेवर शिवसेनेने ज्योत्स्ना सुरेश जाधव यांना तिकीट दिलं आहे. ज्योत्स्ना या विद्यमान नगरसेवक सुरेश जाधव यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. सुरेश जाधव यांची पहिली पत्नी सुनीता या सुद्धा आपल्या सवतीचा प्रचार करताना दिसत आहेत.
दोन्ही पत्नी प्रचार करत असल्यामुळे आपण खुश असल्याचं सुरेश जाधव यांनी सांगितलं आहे. तर आमच्या दोघींमध्ये कोणताही वाद नाही. सगळा परिवार एकत्र प्रचार करत आहोत, अशी प्रतिक्रिया ज्योत्स्ना जाधव यांनी दिली आहे.